
स्थैर्य, फलटण, दि. 27 ऑक्टोबर : फलटण शहरात नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी आणि निंदनीय घटनेमुळे, ऐतिहासिक आणि धार्मिक वारशासाठी देशपातळीवर ‘सु’प्रसिद्ध असलेले फलटण शहर आता ‘कु’प्रसिद्ध झाले आहे, अशी भावनिक खंत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे ही भावना मांडली असून, ‘स्थैर्य’शी बोलताना त्यावर अधिक भाष्य केले.
गेल्या आठवड्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, श्रीमंत रघुनाथराजे यांनी या घटनेमुळे शहराच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
‘स्थैर्य’शी बोलताना ते म्हणाले, “फलटण ही प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. नाईक निंबाळकर राजघराण्याचा तब्बल १२०० वर्षांचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा या शहराला लाभला आहे. जैन धर्मियांची काशी आणि महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून फलटणची ओळख केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात आहे. अशा ‘सु’प्रसिद्ध शहराला गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे ‘कु’प्रसिद्धी मिळाली आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे.”
शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला या घटनेमुळे गालबोट लागल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होती. ही केवळ एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची शोकांतिका नसून, संपूर्ण शहरासाठी वेदनादायी घटना असल्याचे त्यांनी सूचित केले.
आपल्या या प्रतिक्रियेमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून, हे केवळ फलटण शहराबद्दलचे आपले भावनिक मत असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी आवर्जून स्पष्ट केले. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे या घटनेच्या सामाजिक परिणामांवर आणि शहराच्या प्रतिमेवर झालेल्या आघातावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

