
पुणे : संमेलन गीताच्या लोकार्पण प्रसंगी (डावीकडून) राजीव मुळ्ये, विनोद कुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. विठ्ठल वाघ, सुनिताराजे पवार, विनल देशमुख.
स्थैर्य, पुणे, दि. 20 डिसेंबर : सातारा जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेच्या संघर्षाचे, मराठ्यांच्या राजधानीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवित सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शविणारे ‘हे शतकपूर्व संमेलन सातार्याचे; गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे’ या संमेलन गीतातून घडले.
निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताच्या लोकार्पण सोहळ्याचे! संमेलन गीताचे लोकार्पण आज (दि. 19) सुप्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलन गीताचे लेखक राजीव मुळ्ये, गायक विनल देशमुख व्यासपीठावर होते.
सातार्यात तब्बल 33 वर्षांनंतर 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. सातार्यात होत असलेले हे चौथे संमेलन असून सातारच्या भूमीची सर्वांगिण महती दर्शविणारे सात मिनिटांचे हे पहिलेच संमेलन गीत आहे.
संमेलन गीताचा गौरव करून डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, कोणत्याही संस्थेचे, कार्यक्रमाचे गीत लिहिणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. ती प्रतिभावंतांची एक प्रकारची कसोटीच असते. हे गीत लेखणीचा जोर, ताकद, सामर्थ्य आजमावीत असते. साहित्य संमेलनाच्या गीतामधून संमेलनासारख्या महासागराचा कार्यविस्तार, रूपरेषा, संमेलनस्थळाची महती, भूमीचा इतिहास, परंपरा, भवताल यांना मुठीत पकडले आहे. हे गीत म्हणजे महासागारातून दोन ओंजळी पाणी घेऊन त्या सागरालाच अर्घ्य अर्पण करण्याप्रमाणे आहे.
संमेलन गीत लिहिताना आतापर्यंत झालेली संमेलने, शहराचा इतिहास, परंपरा, वाङ्मयीन देणे विचारात घ्यावे लागते. त्या महासागरात आणखी भर घालावी लागते. धोम धरणाचे, कृष्णेचे, आडगावचे, खरातांचे पाणी ओतावे लागते. माणदेशी बनगरवाडीच्या प्रादेशिकतेत कास पठाराची सप्तरंगी इंद्रधनुष्य साकारणारी फुले फुलवावी लागतात. कृष्णाकाठी वाहणारे सह्याद्रीचे वारे मुठीत पकडावे लागते. सातार्याला जाताजाता सांडलेल्या बुगडीचा मागोवा घेताना जय जय महाराष्ट्र माझा असे शाहीर साबळेंच्या डफतुणतुण्यावर गावे लागते. तेव्हा कुठे सज्जनगडाच्या पायथ्याशी वसलेला उपरा आपल्या मनातही स्थान मांडून बसतो.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, संमेलन ही देखील एक संस्था आहे. कोणत्याही संस्थेच्या वाटचालीत बोधचिन्ह, बोधवाक्य आणि गीत यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. तो त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो. या संमेलन गीतातून सातार्याच्या मातीचा सुगंध दरवळतो आहे. संथ वाहणार्या कृष्णामाईचा स्वभाव आणि सह्याद्रीच्या कडेकपारीतून घोंघावणार्या वादळाचा प्रत्यय या गीतातून येतो. पत्री सरकारची स्थापना करणार्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचा कणखर बाणा या गीतात आहे. तसेच आपल्या अमृतासारख्या गोड आणि ओघवत्या वक्तृत्वातून महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणार्या प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या सुंदर भाषेचा परिमळ यात जाणवतो. हे गीत सर्वसामान्य लोकांना संमेलनात सामावून घेत प्रेरक शक्ती देणारे ठरेल, संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे वाटेल.
स्वागतपर प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी संमेलन गीताच्या निर्मितीची माहिती दिली. तर संमेलन गीताचे लेखक राजीव मुळ्ये यांनी गीत कसे घडले याविषयी विवेचन केले. मनोगत व्यक्त करीत गायक विनल देशमुख यांनी गीताचे ध्रुवपद सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार सुनिताराजे पवार यांनी मानले.
