दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुत विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांनी हजेरी लावली होती. या बैठकीत विरोधकांच्या ऐक्याला INDIA नाव देण्यावर एकमत झाले आहे. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आज देशाचा आवाज दाबला जातोय. हा लढा देशासाठी आहे, म्हणूनच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) हे नाव निवडले आहे. ही लढाई भाजप आणि विरोधक यांच्यात नाही. ही लढाई NDA विरुद्ध भारत आहे. नरेंद्र मोदी आणि भारत यांच्यात ही लढाई आहे. त्यांची विचारधारा आणि भारत यांच्यातला हा संघर्ष आहे.
आज भारतातील संस्थांवर हल्ले होत आहेत. आमचा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध आहे. आम्ही लवकरच एक कृती आराखडा तयार करू आणि एकत्र येऊन आमची विचारधारा आणि आम्ही देशात काय करणार आहोत, याबद्दल जनतेला माहिती देऊ.
केजरीवाल काय म्हणाले?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, गेल्या 9 वर्षात पीएम मोदी खूप काही करू शकले असते पण त्यांनी सर्व क्षेत्र उद्ध्वस्त केले. आज 26 पक्ष स्वत:साठी एकत्र आलेले नाहीत, तर देशासाठी आले आहेत. एकीकडे देशाला द्वेषापासून वाचवायचे आहे तर दुसरीकडे नव्या भारताचे स्वप्न घेऊन आपण सगळे एकत्र आलो आहोत. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, NDA, तुम्ही I.N.D.I.A. ला आव्हान देऊ शकता का?, असा प्रश्न भाजपला विचाचरला.
आघाडीचा प्रमुख मुंबईतील बैठकीत ठरणार
भाजपविरोधातील आघाडीला INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) नाव देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांनी या आघाडीच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी त्यांनी आजची बैठक यशस्वी झाल्याचे सांगून पुढील बैठक मुंबईत होणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सचिवालय स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय, 11 जणांची समितीही स्थापन होणार आहे. या समितीत कोण असेल, हे लवकरच ठरवले जाईल. ही समिती INDIA आघाडीचा प्रमुख ठरवणार आहे.