
दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२५ | सातारा |
सातार्याजवळ असलेल्या शिवथर व वडूथ (ता. सातारा) येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया या दोन बँकांची एटीएम फोडली. त्यामधून चोरट्यांनी सुमारे १७ लाखांची रक्कम लंपास केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
शिवथर येथील सातारा-लोणंद रस्त्यालगत स्टेट बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री दोनच्या दरम्यान चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांवर स्प्रे मारून ही यंत्रणा निकामी केली. त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडले. त्यामधून अंदाजे ६ लाख ११ हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार अवघ्या पाच मिनिटांत घडला. ही घटना शिवथर ग्रामपंचायतीने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. एटीएम फोडून चोरट्यांनी लोणंदच्या दिशेने पलायन केले असल्याचेही कॅमेर्यात दिसत आहे. येथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील वडूथ येथीलही बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडले. त्यामधून अंदाजे ११ लाख ३१ हजार ५०० रुपये चोरून नेले असल्याची नोंद सातारा तालुका पोलिस स्टेशनला झाली आहे.
घटनास्थळी सातारा तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु चोरट्यांनी तोपर्यंत चोरी करून पलायन केले होते. एकाच रात्रीत दोन एटीएम फोडल्यामुळे शिवथर परिसरात खळबळ उडाली आहे.