स्थैर्य, औरंगाबाद, दि.२५: असल्याचा दावाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून शहरात पाेलिसांनी रात्रीची संचारबंदी लागू केली. कडेकाेट बंदाेबस्तही तैनात केला. मात्र त्याची जराही भीती न बाळगता चाेरट्यांनी बुधवारी पहाटे उस्मानपुऱ्यातील प्रतापनगरात उद्योजकाचा कुलूपबंद बंगला फोडला. सुरुवातीला १०० ताेळे साेने, दहा लाख रुपये चाेरीला गेल्याची चर्चा हाेती. त्यामुळे पाेलिस अायुक्तांनी येऊन पाहणी केली. मात्र तीन तासांनी काहीच चाेरीला गेले नसल्याची फिर्याद नाेंद झाली. बाहेरगावी जाताना उद्याेजकाने नेहमीची जागा बदलून लाॅकर दुसरीकडे लपवून ठेवल्याने माैल्यवान एेवज चाेरांना सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
उद्याेजक जयंत सोनी व त्यांच्या पत्नी, डेंटल सर्जन डॉ. सुषमा सोनी यांचा प्रतापनगरात दुसऱ्या लेनमध्ये ‘पवनसुत’ बंगला अाहे. मुलीवर शस्त्रक्रिया करायची असल्याने डाॅ. सुषमा आठ दिवसांपूर्वी मुलीसह तिरुपतीला गेल्या. मंगळवारी रात्री जयंत हेसुद्धा तिरुपतीला रवाना झाले. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा नाेकर वाहन धुण्यासाठी बंगल्यात अाला तेव्हा त्याला कुलूप तुटल्याचे दिसले. त्याने तत्काळ सोनी यांना फाेनवर कल्पना दिली. सोनी यांनी त्यांचे मित्र व निवृत्त सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र मेघराजानी यांना कळवले. त्यांच्यामार्फत प्रकरण पाेलिसांपर्यंत गेले. सुरुवातीला साेनी यांच्या बेडरूममधून १०० तोळे सोने व १० लाख रुपये रक्कम चोरीला गेल्याची अफवा पसरली. त्यामुळे पाेलिसही हादरले. तातडीने बंगल्याची तपासणी सुरू झाली. परंतु काही तासांनंतर सोने असलेल्या खोलीकडे चाेरांचे लक्षच गेले नसल्याने काहीच एेवज चाेरीला गेला नसल्याचे सांगण्यात अाले. मेघराजानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत केवळ चोरीचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे. परंतु घरात १०० तोळे सोने होते का, नेमका किती ऐवज चोरीला गेला, यावर मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी बाेलणे टाळले.
कुछ ताे गडबड है… पोलिसांची भूमिका संशयास्पद, माध्यमांना प्रवेश नाकारला
सकाळी १०० तोळे सोने व १० लाख रुपये चाेरीस गेल्याची चर्चा सुरू हाेताच पाेलिस खडबडून जागे झाले. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त रवींद्र साळुंखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, साताऱ्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उस्मानपुऱ्याचे दिलीप तारे, पुंडलिकनगरचे घनश्याम सोनवणे यांच्यासह तीन पोलिस ठाण्यांचे विशेष पथक, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह सायबरचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे माध्यम प्रतिनिधींना, छायाचित्रकारांना बंगल्यात प्रवेश दिला जात नव्हता. फॉरेन्सिकचे अधिकारी दागिन्यांचे रिकामे बॉक्स सोबत घेऊन गेले. परंतु त्यात काय ऐवज होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. एका नोकराला व दोन महिलांना पाेलिस दुपारी दोन वाजता सोबत घेऊन गेले. सकाळी साडेनऊ वाजता घटना उघडकीस अाली, पण दुपारी दोन वाजता श्वानपथक आले. ते बंगल्यातच घुटमळले.
-पहाटे ३ ते ४.१५ दरम्यान तीन संशयित या बंगल्यात हाेते, असा पाेलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
-साेनी यांचा नोकर व दोन महिलांना पोलिसांनी घरातच बसवून ठेवले. १ एक वाजून दोन मिनिटांनी आयुक्त गुप्ता, उपायुक्त खाटमोडे आले. सुमारे ४८ मिनिटे ते बंगल्यात हाेते. विशेष म्हणजे अायुक्त पाहणी करत असताना बंगल्यातून सर्व पाेलिस कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवण्यात अाले. केवळ वरिष्ठ अधिकारीच चर्चा करत हाेते.