म्हसवड शहरात चोरट्यांचा धुडगुस; एकाच रात्रीत १० हुन अधिक ठिकाणी घरफोडी नागरीकांत भिती, श्वानपथकास पाचारण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । म्हसवड । म्हसवड शहरात दि. ९ च्या मध्यरात्री सनगर गल्ली, गुरवगल्ली, मुख्य बाजारपेठेसह खंडोबा मंदिर परिसरातील १० हुन अधिक घरांचे कुलुप कोयंडे तोडुन अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांचे टोळके दशहत माजवण्यासाठी हातात तलवारी घेवुन फिरत असल्याचे शहरातील एका सिसिटीव्ही कँमेर्यात कैद झाले आहे. शहरात १० ते १२ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप २ जणांनीच याबाबत म्हसवड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असुन पोलीसांनी फिर्यादीवरुन घडल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखुन याठिकाणी श्वानपथकास पाचारण करुन तपासचक्रे जोरात फिरवली आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी दि. ९च्या‌ मध्यरात्री येथील सनगर गल्ली येथे‌ ७ ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटुन नेला. यामध्ये पालिकेच्या एका नगरसेवकाच्या घरातुन मोठी रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे तर अन्य एकाच्या घरात दागिण्यावर डल्ला मारला आहे. येथील खंडोबा मंदिरलगत राहत असलेले सूर्यकांत कथले यांच्याही घराचा कोयंडा तोडुन चोरट्यांनी घरातुन त्यांच्या बहिणीचा मोबाईल व रोख २ हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत.

दरम्यान, येथील गुरव गल्ली येथे मध्यरात्री चोरट्यांनी काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न करताना येथील एकाला जाग आल्याने त्याने आरडाओरडा करीत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तेथुन पळ काढताना संबधित व्यक्तीच्या दिशेने जोरदार दगडांचा वर्षाव करीत दहशत निर्माण केली. यामुळे भयभित झालेल्या त्या तरुणाने चोरट्यांचा पाठलाग थांबवला. तसेच सणगरगल्ली येथिल सासणे बोळात सरस्वती महेश ईकारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 36 ग्रैम वजनाचे सोन्याचेे दागिने अंदाजे किमत 1लाख 46 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असुन वरील सर्व ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत दहशत निर्माण करताना नंग्या तलवारी नाचवल्या असल्याचे शहरातील एका ठिकाणी लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले. पोलीसांनी फिर्याद दाखल होताच सदरचे चित्रिकरण ताब्यात घेतले असुन चोरीचा छडा लावण्यासाठी शहरात श्वानपथकास व ठसे तज्ञांना पोलीसांनी पाचारण केले आहे. तपासाची चक्रे स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांच्या‌ मार्गदर्शनाखाली पोलीसांनी फिरवली आहेत. दरम्यान, म्हसवड शहरात एकाच रात्रीत १० हुन अधिक ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने म्हसवडकरांत कमालीची भिती पसरली असुन पोलीसांनी त्वरीत चोरट्यांचा बंदोबस्त करीत शहर व परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!