स्थैर्य, सातारा, दि. 18 : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-भादे रस्त्यावर चोरीचे मोबाईल विकायला आलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील वीर धरणाच्या भिंती शेजारील भादे रस्त्यावर एक सराईत चोरटा दुचाकीवरून (एमएच 11 सीयू1883) चोरी केलेले मोबाईल विक्रीकरिता येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांनी तात्काळ सपोनि आनंदसिंग साबळे यांना पथकासह त्याठिकाणी जावून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सपोनि आनंदसिंग साबळे, यांनी पथकासह शिरवळ-भादे रस्त्यावर सापळा लावला. त्यानंतर माहितीतील वर्णनाप्रमाणे दुचाकीवरून एक इसम भादे ते विर धरण रस्त्याने येताना दिसला. पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला. यावेळी हुलकावणी देवून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाचे शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता सहा अॅन्ड्राईड फोन मिळून आले. या मोबाईलबाबत चौकशी केल्यानंतर त्याने चार-पाच महिन्यांपुर्वी तीन साथिदारांच्या मदतीने सोळशी वाठार, निरा रोड लगत महिंद्रा बार लोणंद, लोणंद-निरा रोडलगत मलगुंडे किराणा स्टोअर्स लोणंद, पिंपोडे बुद्रुक देशी दारुचे दुकान पपोडे बु. वाठार या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या घरफोड्यांप्रकरणी वाठार पोलीस ठाणे आणि लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशययीताकडून 6 अॅन्डरॉईड मोबाईल व गुन्हयात वापरलेली दुचाकी असा एकूण 81 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयीतास पुढील कारवाई करीता वाठार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे सर्जेराव पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे व स. फौ. विलास नागे, जोतीराम बर्गे, मोहन नाचण, राजकूमार ननावरे, संतोष जाधव, प्रविण कडव, गणेश कापरे, संजय जाधव, धीरज महाडीक, वैभव सावंत, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.