दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील नायगांव परीसरात शेतकर्यांच्या शेतातील शेती अवजारे चोरुन धुमाकुळ घालणार्या परजिल्हयातील टोळीचा शिरवळ पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सोलापुर जिल्ह्यातील सराईत चार युवकांना शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. सिताराम लक्ष्मण येडगे वय 28, उमाजी शिवाजी मदने वय 21, ज्ञानेश्वर अनिल जाधव वय 22, विशाल रामचंद्र मदने वय 19 सर्व रा. पानीव, ता. माळशिरस अशी त्यांची नावे आहेत. चोरीस गेलेले रोटावेटर व गुन्हयात वापरलेली पीकअप असा एकुण 4 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त हस्तगत केलेला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी नायगाव येथील शेतकरी परमेश्वर दशरथ नेवसे यांच्या शेतात ठेवलेला 55 हजारांचा रोटावेटर व संतोष लक्ष्मण नेवसे, रा. नायगाव यांचा घरासमोर ठेवलेला 40 हजारांचा रोटावेटर चोरीस गेल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दि. 17 रोजी दाखल झाला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना रोटावेटर हे टोमॅटोचे व्यापारी म्हणून परीसरात येणार्या लोकांनी चोरुन नेल्याचे समजुन आले. त्याप्रमाणे टोमॅटो व्यापारी यांची माहीती काढुन तसेच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही कॅमेरे याचा तपास करुन रोटावेटर चोरी करणार्या लोकांची माहिती काढून पानीव, ता. माळशिरस जि. सोलापुर येथील चार लोकांनी रोटावेटर हे पीकअप जीप क्रमांक (एम. एच.45 ए.एफ्.0550) मधून चोरुन नेल्याचे तपासात निष्पन्न केले.
त्यांना पानीव येथुन ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता दोन्ही रोटावेटर चोरुन नेल्याचे कबूल केले. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन्ही रोटावेटर व गुन्ह्यात वापरलेली पीक जीप असा एकुण 4 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक अजय बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, यांच्या सुचनेनुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षीत, सहा.पोलीस फौजदार पांडुरंग हजारे, पोलीस नाईक जितेंद्र शिंदे, पो. कॉ. अमोल जगदाळे, पो. कॉ. स्वप्नील दौंड यांनी केला आहे. गुन्ह्यांचा अधिक तपास सहा पोलीस फौजदार पांडुरंग हजारे शिरवळ पोलीस ठाणे हे करत आहेत.