कार्यकारी अभियंता गायकवाड यांची माहिती : दुरुस्तीला लागणार दोन दिवस
स्थैर्य, सातारा, दि. 21 : येथील पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामात आज सायंकाळी शहरासह उपनगरांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस जाणार आहेत. त्यामुळे नागरिक उपलब्ध पाणी काटकसर करून वापरावे व प्राधिकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी केले आहे.
बुधवारी सायंकाळच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूकडे सुरू असलेल्या सेपरेटरच्या कामात प्राधिकरणाच्या मुख्य पाईपलाईनला जेसीबीचा धक्का लागला. यामध्ये 450 मिमि व्यासाची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर त्या परिसरात प्रचंड पाणी वाहून गेले. ही बाब कळताच प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी तिथे भेट देऊन पाहणी केली.
या मुख्य पाईपलाईन जोडण्यास दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे पीडब्ल्यूडी कडून या पाईपलाईन फुटल्या असल्याने त्यांच्याकडूनच या पाइपलाइनची दुरुस्ती केली जाणार आहे. हे काम करण्यास दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शाहूपुरी, शाहूनगर, गोडोली, गोडोली या उपनगरांसह शहरातील काही भागांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून प्राधिकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन संजय गायकवाड यांनी केले आहे.