दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटणला सर्व सोय नियोजन व्यवस्थित झाले आहे. फलटणला खो – खोची जी परंपरा आहे, ती संस्थान काळापासून आहे. येथे आलेल्या सर्वच खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या समवेत आलेल्या सर्वांचे आभार मानत फलटणला होणाऱ्या सामन्यात कधीही कमतरता पडली नाही व आगामी काळात पडणार सुद्धा नाही, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर राष्ट्रीय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोप समारंभात विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, राज्य क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो – खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटण येथे पार पाडत असलेल्या राष्ट्रीय खो – खो स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक करणे गरजेचे आहे. फलटणला खो – खो खेळाडूंसह इतर सर्वच टीम मेंबरची जी राहण्याची व भोजनाची जी सोय करण्यात आली आहे. ती अतिशय उत्कृष्ठ आहे. भविष्यात कोणतीही स्पर्धा असेल तर त्यामध्ये फलटणकर मागे राहणार नाहीत. सातारा जिल्ह्यामध्ये क्रीडा विभाग उत्तम रित्या कार्यरत आहे. त्यामध्ये फलटणला होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धा ह्या अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाल्या आहेत, असे मत माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
फलटण सारख्या शहरात पाचव्यांदा खो – खोचे राष्ट्रीय सामने भरवले जात आहेत. त्यावरूनच फलटण व खो – खो हे वेगळे समीकरण आहे, हे दिसून येत आहे. भारतीय खो – खो महासंघाच्या वतीने जे पुरस्कार दिले जात आहे. ते अतिशय उल्लेखनीय आहे. क्रिकेट नंतर संपूर्ण देशामध्ये श्रीमंत असा खेळ म्हणजे खो – खो आहे. खो – खो व कुस्तीने राज्याला उत्कृष्ठ असे खेळाडू दिले आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही खो – खो, कुस्तीचा नवा आराखडा तयार करत आहे. या आराखड्यात या खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. क्रीडा खेळात खेळाडूं बरोबर प्रशिक्षक यांचे योगदान महत्वाचे आहे. प्रशिक्षक यांच्या प्रशिक्षणासाठी आपण सदैव तत्पर आहोत. येणाऱ्या काळात कधीही आपल्यातील प्रशिक्षक यांना उत्तम शिक्षण देण्यात येईल. क्रीडा महासंचनालय यांच्या वतीने सर्व सहकार्य येणाऱ्या काळात खो – खो खेळाडूंना राहील असा विश्वास यावेळी महाराष्ट्र क्रीडा महासंचनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी दिला.
फलटणला सुंदर वातावरणामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व खेळाडू यांना राहण्याची, खाण्याची व इतर व्यवस्था उत्तम आहे. आज अंतिम सामन्यासाठी जी गर्दी झालेली आहे. त्यातील प्रत्येक जण इथे असलेल्या खेळाडूला आशीर्वाद देवूनच पुढे जात आहे. ह्या खेळाडूंना आपण सर्वांनी येवून एक नवीन दिशा दिलेली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचे योगदान आहे, ते उल्लेखनीय आहे. फलटणला झालेले सामने हे खेळाडू कधीही विसरणार नाही. फलटणचे असलेले उत्तम नियोजन हे आयोजन कर्त्यांचे यश आहे, असे मत भारतीय खो – खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र खो – खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे खो – खो अतिशय नियोजनबध्द पद्धतीने पार पडला आहे. कोणत्याही व्यवस्थेमध्ये कमतरता फलटणला कोणालाही जाणवली नाही. फलटणची व खो – खो ची नाळ एका वेगळ्या पद्धतीने जोडली गेली आहे. आता आगमी काळामध्ये खो – खो खेळ आंतरराषट्रीय खेळाला जाईल. तेंव्हा सुद्धा त्यामध्ये फलटणचे नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. क्रिकेट नंतर देशातील सर्वात श्रीमंत म्हणून भारतीय खो – खो महासंघाचे ओळख आहे, असेही यावेळी भारतीय खो – खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय खो – खो स्पर्धेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. फलटणला अनेक खो – खोचे खेळाडू लाभले आहेत. फलटण व खो – खो हे एक समीकरण तयार झाले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. फलटणसह जिल्हा व राज्य स्थरातील सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे. भारतीय खो – खो महासंघाचे फलटण मध्ये झालेल्या स्पर्धांमधील खेळाडूंना मोठे सहकार्य केलेले आहे, त्यांचे विशेष आभार यावेळी महाराष्ट्र खो – खो असोसिएनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र खो – खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आभार सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केले.