दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यातील सुमारे ४ हजार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मानवी हस्तक्षेपाशिवाय ऑनलाईन प्रणालीने आंतर जिल्हा बदल्या केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे. अशा पद्धतीने आंतरजिल्हा बदल्यांची प्रणाली विकसीत करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाल्यामुळे बदल्यांमधील गैरप्रकारांना आळा बसेल, असेही श्री. भांडारी यांनी म्हटले आहे.
या पत्रकात श्री. भांडारी यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता. शिक्षक संघटनांनीही बदली प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात तक्रारी केल्या होत्या. या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेपामुळे शिक्षकांचा छळही केला जात होता. त्यामुळेच अशा पद्धतीची राजकीय हस्तक्षेपाला दूर ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित केली जावी अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. ही मागणी आता पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाद्वारे ३ हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश ऑनलाईन प्रणालीद्वारे जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शंभर टक्के स्वयंचलित पद्धतीने या बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसीत करण्यात आलेल्या प्रणालीमुळे बदल्यांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. या बदल्यांसाठी ठरवण्यात आलेल्या निकषांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. ग्रामीण भागातील सरंजामदारांकडून राजकीय हेतूंनी प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा गैरवापर होत असे. या सरंजामदारांना या बदली प्रक्रियेमुळे चाप बसला आहे, असेही श्री. भांडारी यांनी नमूद केले आहे.