पुन्हा कठोर लॉकडाउन करन्याची वेळ येऊ नये


स्थैर्य, मुंबई, दि.10 : टप्प्याटप्प्याने लॉकडाउन हटवून निर्बंध हळूहळू शिथिल केले जात असले तरीही संकट अजून टळलेले नाही. मात्र काही सवलती देताच रस्त्यावर झुंबड उडाली. ही मोकळीक जीवघेणी ठरत असेल तर पुन्हा कठोर लॉकडाउन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतर सरकारने ‘पुनश्‍च हरी ओम’ चा नारा देऊन ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले आहे. ठप्प झालेले जीवनचक्र सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोकळीक दिली जात आहे. मात्र, यामुळे सर्वत्र गर्दी वाढत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकट अजून टळलेले नसल्याची जाणीव करून दिली. आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावे लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावले टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथिलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेले नाही. अजूनही लढा संपलेला नाही. कोरोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करून चालणार नाही. पण सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब करण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवले पाहिजे. आपल्याला खूप सावध राहून जगावे लागणार आहे. सवलत देताच रस्त्यांवर गर्दी झाली. अशी गर्दी टाळली पाहिजे. गर्दी कमी झाली नाही व मोकळीक दिल्यामुळे नुकसान होत असेल तर मग नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाउन करावा लागेल. लोकांनी आतापर्यंत सरकारला पूर्ण सहकार्य केले आहे. सरकारच्या सर्व सूचनांचे पालन कसोशीने केले आहे. जनता ही वेळ येऊ देणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी

मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या लोकांसाठी असेल. लोकल सुरू नसल्याने रुग्णालयांमध्ये काम करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांना कर्तव्यावर जाता येत नाही. लोकलसेवा सुरू झाल्यास त्यांना रुग्णालयात जाणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मृतदेह बेपत्ता; चौकशी करून कारवाई 

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील भोंगळ कारभाराची उदाहरणं सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकात आढळून आला. सायन रुग्णालयातील एक मृतदेह बेपत्ता आहे. त्याबद्दल विचारता, या प्रकारांची चौकशी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार कोरोनाविरुद्धची लढाई गांभीर्याने लढत आहे. सरकार गंभीर नसते, तर देशातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या नसत्या, असे सांगत यावरून विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले तर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी नाही 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोणतीही कल्पना न देता खात्याच्या सचिवांनी विभागाचा प्रस्ताव परस्पर मंत्रिमंडळासमोर आणल्यामुळे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी कोणतीही खडाजंगी झाल्याचे वृत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साफ फेटाळले. मंत्रिमंडळात राज्याच्या हिताचे निर्णय होत असतात. तिथे बाहेरून कोणी येत नाही. सूचना जरूर येतात. पण अशी खडाजंगी झाल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!