दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2023 | फलटण | फलटण शहरामध्ये फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून भव्य – दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणूक मार्गामध्ये कोणते अडथळे आहेत का ? महावितरणच्या लाईन्स किंवा मधी कोणते पोल वगैरे आहेत का ? मिरवणूक मार्गावर इतर कोणत्या अडचणी आहेत का ? याची पाहणी करण्यासाठी व प्रशासनाला योग्य ते निर्देश देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली व मिरवणूक मार्गावर कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे निर्देश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गाची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन व युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, फिरोज आत्तार यांच्यासह फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून उद्या दिनांक 21 रोजी रात्री 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक सोहळा गजानन चौक येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र बेडके यांनी दिली.
फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीची सुरुवात ही गजानन चौक येथून होणार आहे. त्यानंतर श्रीराम मंदिर – शंकर मार्केट – शुक्रवार पेठ – प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल – श्री हरिबाबा मंदिर – पाचबत्ती चौक व बारामती चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. या मिरवणुकीमध्ये सर्वच महापुरुषांचे पुतळे असणार आहेत. त्यासोबतच मर्दानी खेळ, घोडे, उंट व विविध वाद्यांच्या रूपाने ऐतिहासिक वातावरण तयार केलेले आहे. मुंबई येथील प्रसिद्ध असलेले मुला व मुलींचे वाद्य पथक हे या मिरवणुकीत असणार आहे. मिरवणुकीची सुरुवात गजानन चौक येथून होणार आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांनी यावेळी दिली.
फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जी मिरवणूक निघणार आहे; त्या मिरवणुकीमध्ये फलटण शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण कार्याध्यक्ष आमिर शेख यांनी दिली.
फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जी शिवजयंतीची मिरवणूक फलटण मधून निघणार आहे; त्या मिरवणुकीमध्ये बारा बलुतेदार व अठरापगड जाती मधील सर्वच महापुरुषांचे पुतळ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. तरी फलटण शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केले.
फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती समितीच्या माध्यमातून फलटण शहरामधून जी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य – दिव्य मिरवणूक निघणार आहे; त्या मिरवणुकीमध्ये बारा बलुतेदार व अठरापगड जातीच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीची जय्यत अशी तयारी केलेली आहे. तरी फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक फिरोज आत्तार यांनी केलेले आहे.