
दैनिक स्थैर्य | दि. 17 एप्रिल 2025 | फलटण | नीरा देवधरचे पाणी माळशिरस व सांगोला तालुक्याला देण्यात येऊ नये, याबाबत कोणतेही स्टेटमेंट हे पत्रकार परिषदेत देण्यात आले नाही. फक्त नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर हक्काचे पाणी जावू नये यासाठी आम्ही आग्रही भूमिका ही पत्रकार परिषदेत मांडली असल्याचे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
दैनिक “स्थैर्य”सोबत मत व्यक्त करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
याबाबत अधिक माहिती देताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या सर्वांना नीरा देवधरचे पाणी मिळाले पाहिजे. नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जावू देणार नाही; यासाठी वाटेल ते करावे लागले तरी त्याची तयारी आमची आहे. नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या सर्वांना नीरा देवधरचे पाणी मिळाले पाहिजे.
नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी देण्याचा डाव काही जणांचा आहे. त्याला आमचा कायम विरोध राहिला आहे. नीरा देवधर लाभक्षेत्रात असणाऱ्या सर्वांना हक्काचे पाणी हे मिळालेच पाहिजे. लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जावू नये, यासाठी संघर्ष करावा लागला तरी सुद्धा करण्याची आमची तयारी आहे, असे मत सुद्धा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.