महाबळेश्‍वर व पाचगणी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पांचगणी, दि. 4 : अनलॉक 4 नुसार राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांना जे नियम व अटी लागू केल्या आहेत त्याचे पालन करून महाबळेश्‍वर व पाचगणी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी बैठकीत दिली.

यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील उपस्थित होत्या. अनलॉक चार लागू करण्यात आला असला तरी पर्यटनस्थळांवरील हॉटेल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते म्हणून येथील हिरडा विश्रामगृहात प्रांताधिकारी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाबळेश्‍वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यासह महाबळेश्‍वर व पाचगणी येथील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

पर्यटकांचे ऑनलाइन आरक्षण करावे, आलेल्या पर्यटकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे, आलेल्या सर्व पर्यटकांची माहिती ऑनलाइन प्रशासनास कळविली पाहिजे, हॉटेलमधील सर्व नोकरांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, पर्यटकांना रूम देण्यापूर्वी व पर्यटक गेल्यानंतर रूममध्ये औषध फवारणी करण्यात आली पाहिजे तसेच हॉटेल व परिसरात दोन वेळा फवारणी करणे आवश्यक आहे. येणार्‍या पर्यटकांची थर्मामीटर व ऑक्सिमीटरने तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. पर्यटकांनी व हॉटेल कर्मचार्‍यांनी मास्क व हातमोजे यांचा वापर करणे आवश्यक आहे. वापरलेले हातमोजे व मास्क हा वैद्यकीय कचरा आहे. त्याची विल्हेवाट त्याच पद्धतीने लावली गेली पाहिजे. मध्यवर्ती ठिकाणी असा कचरा गोळा करून त्याची एकत्र विल्हेवाट लावण्याचा हॉटेल संघटनेने प्रयत्न करावा. पर्यटकांमध्ये जर कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर अशा पर्यटकांची माहिती प्रशासनास देणे आवश्यक आहे. अशा पर्यटकांना उपचारासाठी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती करणे आवश्यक आहे किंवा अशा पर्यटकांची हॉटेलमध्ये स्वतंत्र सोय केली पाहिजे. हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉल बंदच राहतील; परंतु जर त्याचा वापर केवळ पंधरा लोक करणार असतील तर अशावेळी हॉल सुरू ठेवता येईल. स्विमिंग पूल व बार बंदच राहतील. आलेल्या पर्यटकांची येथे येण्यापूर्वी पंधरा दिवसांच्या प्रवासाची माहिती घेतली गेली पाहिजे. हॉटेलमधील सर्वांनी शारीरिक अंतर राखून काम केले पाहिजे, अशा अनेक सूचना व नियम अटींची माहिती यावेळी प्रांताधिकार्‍यांनी दिली.या बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कदम, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्यासह महाबळेश्‍वर व पाचगणी येथील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!