दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२४ | फलटण |
राज्यात आज महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं असून फलटण तालुक्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवत फलटणचा सर्वसामान्य माणूस असलेले सचिन पाटील यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठविले आहे. त्यामुळे आता फलटणच्या विकासाला कोणताही अडथळा राहिला नसल्याचे प्रतिपादन फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
गुरुवार, ५ डिसेंबर रोजी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल फलटण शहरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी समशेरसिंह बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनुप शहा, माजी नगरसेवक सचिन अहिवळे उपस्थित होते.
समशेरसिंह पुढे म्हणाले की, फलटणचा विकास गेल्या दहा वर्षात रखडला होता. आता सचिन पाटील यांच्या रूपाने महायुतीचा आमदार विधानसभेत गेल्यामुळे आता नीरा-देवघर, धोम-बलकवडी, फलटण-बारामती रेल्वे, फलटण-पंढरपूर हायवे असू द्या ही कामे व फलटण शहरातील जी अविकसित कामे राहिली आहेत ही सर्व कामे आता पूर्ण होतील. ही कामे जाणीवपूर्वक करण्यात आली नाहीत. अडथळ्यांची शर्यत आता संपून फलटणमध्ये आता कायद्याचे आणि प्रगतीचे राज्य येणार आहे.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव म्हणाले की, आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याला मिळाले आहेत. त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ हा शब्द खरा करून दाखविला आहे. मुख्यमंत्री म्हणून ते आता शेतकरी, महिला व राज्यातील सर्व नागरिकांचा विचार करून अनेक योजना राबवतील, असा मला विश्वास आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री असताना अनेक योजना राज्यात यशस्वीपणे राबविल्या तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शब्दाला जागणारे नेते असून कामे मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
अनुप शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा आजचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून तिसरी इनिंग सुरू होत आहे. राज्याला अपेक्षित असणारा विकास महायुतीच्या शासनाकडून आता घडणार आहे. केंद्रातही महायुतीचे सरकार व राज्यातही महायुतीचेच सरकार असल्यामुळे फलटणच्या जनतेला आता चांगले दिवस बघायला मिळणार आहेत. फलटणच्या जनतेसाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर कायम उपलब्ध असतील. फलटणच्या जनतेच्या समस्या महायुती शासनाकडून सोडविल्या जातील, असे मी आश्वासन देतो.