स्थैर्य, पाटणा, दि.१३: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि जेडीयूने याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
बिहारमधील मुस्लिम मतदारांची टक्केवारी 16 टक्के आहे. ब-याच जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. तिकिट वाटपाकडे पाहिल्यावर काँग्रेसला मुस्लिम मतदारांवर विश्वास राहिला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
निवडणुकीत जातीय गणितं महत्वपूर्ण ठरतात. त्यात बिहारच्या राजकारणात जात-धर्म या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिहारमध्ये मुस्लिम मतदारांची टक्केवारी 16 टक्के आहे. हा टक्का खूप मोठा आहे. मुस्लिम मतदारांचा टक्का बिहारच्या राजकारणाला आणि सत्तासमीकरणाला वेगळं वळण देऊ शकेल. मात्र काँग्रेसने मुस्लिम व्यक्तीला तिकीट नाकारल्याने मुस्लिम जनतेमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
सर्वसमावेशकता ही काँग्रेस पक्षाची ओळख आहे. देशातील बराचश्या मुस्लिम समाजाचं मतदान हे काँग्रेसच्या पारड्यात पडतं. देशातील अल्पसंख्याक जनतेला काँग्रेसकडून ब-याच अपेक्षा आहेत. मात्र जर समाजातील एकाही व्यक्तीला प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आता विचार करण्याची वेळ आली आहे, असं मत बिहारमधील काही मुस्लिम मतदारांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केलंय.
काँग्रेसने मुस्लिम समाजावर अन्याय केलाय. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मुस्लिमच काय काँग्रेस कुणालाच सामावून घेत नाही, अशी टीका जेडीयूचे अजय आलोक यांनी केलीये. तर भाजपनेही याच मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. धर्मनिरपेक्षता हे काँग्रेसचं फक्त नाटक आहे. मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी देण्यात काँग्रेसला काय अडचण होती, असा सवाल भाजपने विचारला आहे. दुसरीकडे आमचा कुठल्याही समाजाला डावलण्याचा विचार नाही. सर्वांना सोबत घेऊन आम्हाला बिहारचा विकास करायचा आहे. पुढच्या उमेदवार यादीत सर्वांना सामावून घेण्याचा आमचा विचार आहे, असं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.