कुंभार वाडयातील मूर्तीकारांनी घरगुती मूर्ती बनवण्यावर भर दिला
स्थैर्य, सातारा, दि. 11 : गतवर्षी महापूराच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरी करण्यात आला. यंदा मात्र कोरोनाचे गडद संकट निर्माण झाल्याने गणेशोत्सव साजरी होणार का? याकडे सगळयांचे लक्ष वेधले आहे. यामुळे गणेश मंडळांनी मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिलेली नाही. यामुळे कुंभार वाडयातील मूर्तीकारांनी घरगुती मूर्ती बनवण्यावर भर दिला आहे.
करोना वायरसमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्याने अंतरजिल्हा वाहतूक बंद झाली. यामुळे कच्चा माल उपलब्ध झाला नाही. यांचा फटका यंदाचा गणेशोत्सवाला बसला आहे. उन्हाळयात कुंभार वाडयात गणरायाच्या वेगवेगळया रूपातील मूर्ती बनवण्याचे काम वेगाने सुरू असते. तोच पावसाळयात रंग रंगोटीचे काम हाती घेतले जाते. मात्र कोरोनाच्या धास्तीने गणेश मंडळांनी मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिलेल्या नाहीत. प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी गणरायाचे दर्शन घ्यायला सगळीकडे गर्दी होत असते. यंदाही अशी गर्दी होऊन सोशल डिस्टन्स नियमांची पायमल्ली होईल. म्हणून शासनाच्या आदेशाने गणेशोत्सव साजरी करणार असल्याची माहिती सम्राट मंडळाचे शंभु तांबोळी यांनी दिली.
मंडळाच्या मूर्ती इतक्याच घरगुती गणपतीच्या मुर्ती कुंभार वाडयात बनवल्या जातात. यंदा मात्र मूर्तीकारांना कच्चा माल उपलब्ध झाला नाही. यामुळे गतवर्षीच्या शिल्लक कच्च्या मालापासून मूर्ती बनवण्यात आलेल्या आहे. या मूर्तीची उंची 6 इंच ते 2.5 फुट ऐवढीच ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याने खर्च कमी करण्यासाठी लहान उंचीची मूर्ती खरेदीवर भर दिला जाणार आहे. तसेच प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेक्षा शाडुच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. शाडुच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळतात. यामुळे मूर्ती विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न निर्माण होणार नसल्याची माहिती कुंभार वाडयातील मूर्तीकार पोपट कुंभार यांनी दिली.