स्थैर्य, फलटण दि.15 : वयाच्या 35 वर्षानंतर हाडांची जडणघडण थांबते. त्यामुळे या वयापर्यंतच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सांधेदुखी टाळण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसून यासाठी लहानपणापासूनच योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे, जोशी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.प्रसाद जोशी यांनी सांगितले.
जोशी हॉस्पिटल, फलटण प्रस्तुत ‘मला पुन्हा एकदा उभं राहायचं’ या कार्यक्रमात रेणू भिडे यांनी डॉ.प्रसाद जोशी यांच्याशी मुलाखतीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ.जोशी म्हणाले, पस्तीशीनंतर व्यक्तीच्या हाडांची जडणघडण होत नाही. त्यामुळे वयाच्या पस्तीशीपर्यंत आपल्याला जितकी शक्य आहे तितकी हाडाची बळकटी आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सकस आणि कॅल्शियम युक्त आहार, नियमित व्यायाम करावा. शाकाहारी व्यक्तींनी आहारात मेथी, पालक, नाचणीचे सत्व रोज घ्यावे. गायीचे ताजे दूध, खारिक, खजूर, गुळ याचा देखील हाडाच्या बळकटीकरणासाठी उपयोग होतो. हे सर्व केल्यास सांधेदुखी टाळता येते. सांधेदुखी टाळण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. लहानपणीपासून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
आज संगणकावर काम करणारे, बराच वेळ मोबाईलवर व्यस्त असणार्या व्यक्तींमध्ये मानेचे आणि मणक्याचे आजार जडलेले दिसतात. हे टाळण्यासाठी दर एक तासानंतर किमान पाच मिनीटांचा ब्रेक घेतला पाहिजे. यावेळी मानेच्या, गुडघ्याची हालचाल करुन शरीराची हालचाल करावी. कारण अनेक तास एकाच जागेवर बसल्याने शिरा, सांधे आखडून जातात आणि त्यातून सांधेदुखीला प्रेरणा मिळते. मान खाली घालून मोबाईल आपण बघतो; त्यातून 140 टक्के जास्त मानेवर ताण येवून मानेवर मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे संगणक व मोबाईलवर काम करणार्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही, डॉ.प्रसाद जोशी यांनी यावेळी सांगीतले.
बर्याच घरांमध्ये वृद्ध व्यक्ती असतात आणि त्यांचे पाय घसरुन पडण्याचे प्रमाण वारंवार घडत असते. याबाबत बोलताना डॉ.प्रसाद जोशी म्हणाले, वृद्ध व्यक्ती पडल्यानंतर हाडे ठिसूळ झाल्यामुळे हाडाला मार बसतो. बर्याचदा या व्यक्तीचे हाड पडल्यामुळे मोडले की हाड मोडल्यामुळे व्यक्ती पडली हे समजत नाही. कारण वयोमानामुळे हाडे इतकी ठिसूळ झालेली असतात की बहुदा हाड आधी मोडल्यामुळे मग ही व्यक्ती पडते. तर काही वेळा पाय घसरुन पडल्याने व्यक्ती पडते व हाडे ठिसूळ झाल्याने हाड मोडते. पडल्याने बर्याचदा पहिल्यांदा पाय खुब्यात मोडतो. त्यामुळे बाहेरच्या बाजूला फिरतो आणि प्रचंड वेदना होतात. अशा वेळी घरातल्या लोकांनी त्यांना उचलून बेडवर ठेवावे. त्यानंतर त्यांचा पाय सरळ ठेवणे आवश्यक असते. अन्यथा अशा वेळी पेशंट पाय पोटापाशी आखडून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यातून वेदनाही वाढतात आणि मोडलेले हाड पुढे सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाय सरळ ठेवून पायाखाली उशी द्यावी म्हणजे त्याचा त्यांना आधार मिळेल. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेवून पुढील उपचार करावेत, असेही डॉ.प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.