मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून काहींचे षड्यंत्र – मनोज जरांगे पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून षड्यंत्र रचणे सुरू आहे, ते आपल्याला तोडून काढायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार आहे. मात्र, समाज बांधवांनी गाफील राहू नये, असे आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.

सातार्‍यातील गांधी मैदानावर आयोजित विराट सभेत ते बोलत होते.

जरांगे-पाटील पुढे म्हणाले की, आज माझ्या सभेसाठी सातारा नगरीतील व जिल्ह्यातील बांधव प्रचंड उन्हातही एकजूट करून थांबले आहेत. उन्हात जरी बसावे लागले तरी समाजाला आणि मराठा बांधवांच्या लेकरांच्या आरक्षणासाठी हे उन्हाचे चटके खावे लागतील. उन्हाला आणि पावसाला घाबरून घरात बसलो तर आपल्या लेकरांना न्याय कसा मिळणार? मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून षड्यंत्र रचणे सुरू झाले आहे. ते तोडून काढायचे आहे.

गेली सत्तर वर्षे आपल्या पिढ्या आरक्षण समजून न घेतल्यामुळे बरबाद झाल्या. ज्यांनी आरक्षण समजून घेतले ते आरक्षणात गेले आणि त्यांच्या पिढ्या सुधाारल्या. मराठ्यांना सत्तर वर्षांपासून आरक्षण होते, तरीही ते दिले नाही. ही लढाई सामान्य मराठ्यांची आहे. सामान्य मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि भवितव्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे हा लढा सुरू आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. पण, जाणून-बुजून षड्यंत्रे रचली आणि सत्तर वर्षांपासून सत्ताधार्‍यांवर काही ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही मिळू दिले नाही, हे आता सिद्ध झाले आहे. १८०५ ते १९६७ पासून मराठ्यांचे आरक्षण असल्याचे पुरावे मिळू लागले आहेत. जर सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा ही प्रगत जात म्हणून नंबर एकवर असती. आमचे आरक्षण खाताना यांना काही वाटले नाही. आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले. समितीने नोंदी शोधायला सुरुवात केल्यानंतर लाखांनी नोंदी सापडायला सुरूवात झाली. मराठ्यांना दोन अंग आहेत. एक म्हणजे आलेल्या अहवालात मराठा क्षत्रिय असून त्यांना लढायचे माहिती आहे आणि मराठा शेतीही कसतो व धान्य पिकवतो. जर मराठ्यांची पोरे मोठे झाली तर आपले काय, या भीतीने त्यांनी षड्यंत्र रचले व आरक्षण दिले नाही. पुरावे बुडाखाली लपवून ठेवले. ज्या ज्या वेळी समित्या झाल्या, त्या त्या वेळी समितीने पुरावे शोधण्याचे काम केले. परंतु, सरकारकडं पुरावे सापडले नाहीत, असा अहवाल येत होता. जर त्यावेळी पुरावे मिळाले नाही तर तेच पुरावे आता कसे सापडत आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे. गेली ७०-७५ वर्षे आमच्या लेकरांचे वाटोळे कोणी केले, त्याचे नाव सांगावे. जर मराठ्यांची नोंदी नव्हत्या आणि मराठा आरक्षणात नव्हता तर या नोंदी सापडल्याच कशा आणि सापडल्या तर मराठा आरक्षणात होता. आता आमचे सत्तर वर्षात झालेले नुकसान भरून हवे आहे. आमच्या जागा बळकावल्या कुणी, आमच्या समाजाने आणि आमच्या लेकरांनी असे काय पाप केले की, आरक्षण असताना तुम्ही दिले नाही. हा प्रश्न समाजाच्या अस्तित्वाचा आहे. २४ डिसेंबरला सरकार आरक्षण देण्यासाठी कायदा पारीत करणार आहे, तोपर्यंत मराठ्यांची कसोटी आहे. गाफील राहू नका, अन्यथा आपल्या पोरांचे वाटोळे होण्यास आपण स्वत: जबाबदार असू, असा इशाराही मराठा समाजाला जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला.

जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले की, समितीने मराठवाड्यातील नोंदी शोधल्या. हैद्राबाद संस्थानमधून मिळणारे दस्ताऐवज याचा अहवाल बनवून कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. त्या नोंदीचा अहवाल बनवून मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारित करण्यासाठी आवश्यक असलेला अहवाल सरकारने स्वीकारला. तरीही ज्या नोंदी मिळतील त्या नोंदीचा अहवाल तयार करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ५० टक्क्यात आरक्षण द्यावे, हेच सरकारसोबत ठरले आहे. परंतु, अहवाल फक्त मराठवाड्याचाच झाला. मी मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि खानदेश यांच्यात भेद करू शकत नाही. त्यामुळे समितीला राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली.

ज्यांच्या नोंदी नसतील त्याच नोंदीच्या आधारावर अहवाल बनवून २४ डिसेंबरला मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात येईल, असे ठरल्यानंतरच आरक्षण मागे घेण्यात आले. तरीही मराठ्यांनी सावध रहावे, अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचे सोने करा. आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. जेवढे सत्तर-पंच्याहत्तर वर्षात पक्ष झाले, त्या पक्षातील एकही नेता आपल्या लेकरांच्या मदतीला यायला तयार नाही, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ यांचा समाचार घेताना जरांगे-पाटील म्हणाले की, मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, मी दिसायला बारीक असलो तरी माझ्या टप्प्यात आला की वाजवतोच, माणसाचे वैचारिक मतभेद असावेत, पण आपण कोणत्या पदावर आहोत, त्याची गरीमा राखून त्यांनी बोलावे. त्यांच्याकडे राज्याचे पालकत्व आहे, त्यांनी भान ठेवावे. मी पाचवी शिकल्याचे ते सांगतात. पण सरकारने माझे शिक्षण किती आहे, यावरच तीन दिवस घातलेत. लोकांचे खाल्ले की त्यांचा तळतळाट लागतो. आधी तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, तुम्ही कोणाच्या पाहुण्याकडे राहून जगलात, हे सर्वांना ठाऊक आहे. तुमच्याकडे काहीही नव्हते आणि एवढी संपत्ती कशातून आली हे सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टाचा पैसा ओरबाडून खाल्ला म्हणूनच तुम्हाला तुरुंगात जावे लागले.

महात्मा फुले यांनी राज्याला एक वेगळा आदर्श दिला. त्यांचा आदर्श त्यांनी स्वत:समोर ठेवून त्यांनी बोलायला हवे होते. जाती-जातीत दंगली घडवण्याची भाषा केली जाते. परंतु, त्यांचे स्वप्न पूर्ण होवू देणार नाही. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यात कोणतीही तेढ निर्माण होवू द्यायची नाही, या राज्यात शांतता राहिली पाहिजे, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. मराठे आरक्षणात गेले हे लक्षात आल्यानेच जातीय दंगली घडतील, अशी वक्तव्ये करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव असल्याचे जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.

या सभेस मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह हजारो मराठा बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!