स्थैर्य, मुंबई, दि.६: २०२० च्या पहिल्या सहामाहीत घसरण पाहिल्यानंतर दुसऱ्या सहामाहीत अनेक कंपन्यांचे आयपीओ लाँच झाले होते. या आयपीओंना अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. भरपूर तरलता, अर्थव्यवस्थेच्या अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणेने बाजाराच्या धारणेत वाढ झाली. ही स्थिती प्रायमरी मार्केटमध्येही पाहायला मिळाली. गेल्या वर्षी प्रायमरी मार्केटमध्ये ३१,००० कोटी रु. जमा केले. २०२० मध्ये १६ आयपीओ लाँच झाले. त्यापैकी १५ ची लाँचिंग दुसऱ्या सहामाहीत झाली होती. एसबीआय कार्ड २०२० च्या पहिल्या सहामाहीत लाँच होणारा एकमेव आयपीओ होता. यानंतर कोविड-१९ मुळे बाजाराची स्थिती खराब झाली. यामुळे सर्वसाधारण धारणेवर परिणाम झाला. मात्र, २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत लाँच झालेल्या आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला. बर्गर किंग इंडिया, रोझारी बायोटेक आणि रूट मोबाइलने इक्विटी किमतीतून १००-२०० टक्क्यांचा परतावा दिला. दुसरीकडे, इक्विटी बाजारानेही १५ टक्क्यांचा फायदा दिला आहे आणि गेल्या वर्षी बाजारात २१ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दिसली. यामुळे आयपीओ आणण्याच्या तयारीतील अन्य कंपन्या उत्साहित आहेत. २०२१ आयपीओच्या दृष्टीने खूप चांगले सिद्ध होईल, अशी आशा आहे. या वर्षी कमीत कमी १६ कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत. यामध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पाेरेशन, कल्याण ज्वेलर्स, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, इंडिको पेंट, ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी आणि रेलटेल कॉर्पाेरेशन ऑफ इंडियाचा समावेश आहे. याशिवाय देशाची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओही या वर्षी येऊ शकतो. देशाचा हा सर्वात मोठा आयपीओ असेल, असे मानले जात आहे.
हे वर्ष चांगले राहील
मेहता इक्विटीजचे एव्हीपी रिसर्च प्रशांत तापसे म्हणाले, शेअर बाजारात गेल्या ४ ते ६ महिन्यांपासून बराच सकारात्मक कल दिसत आहे. त्यामुळे आयपीओ बाजारही बळकट राहील. २०२१ मध्येही भारतीय शेअर बाजार आपला वेग कायम ठेवेल आणि प्रायमरी बाजारातही याचा परिणाम दिसू लागेल. जागतिक जोखीम क्षमतेत सतत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत आगाऊ कंपनी कर डेटात सुधारणा, देशातील आर्थिक डेटात सलग सुधारणेमुळे आगामी तिमाहीत जीडीपीत वृद्धीचे संकेत मिळत आहेत. यामुळे भारतीय इक्विटीजला मदत मिळेल.