दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आणि प्रशासनाच्या झालेल्या बोलण्यावरून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे पुकारण्यात आलेली उपोषण चार दिवसांनी करण्यात यावे, असे निर्देश दिलेले आहेत. आगामी चार दिवसांमध्ये जर दिगंबर आगवणे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर चार दिवसांनी आम्ही उपोषणाला बसू असा इशारा फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी यावेळी दिला.
फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये अनुप शहा बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अनुप शहा म्हणाले की, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याकडे काही तक्रारींचा तपास सुरू आहे. ते करीत असलेल्या तपासावर आमचा व भारतीय जनता पार्टीचा कसलाही विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्याकडून तो तपास काढून दुसऱ्याकडे देण्यात यावा; यावर फलटण पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी तो तपास यापुढे त्यांचा तपास मी स्वतः करीन अशी ग्वाही यावेळी दिली.
फलटण शहरासह फलटण पोलीस उपविभागामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, यासाठी विशेष दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. फलटण येथे समोरा समोर उपोषण केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे समोरा समोर उपोषण करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार नाही. जर उपोषणाला बसायचे असेल तर अधिकारगृहाच्या एका बाजूला त्यांनी बसावे व एका बाजूला तुम्ही बसावे, असे यावेळी फलटण पोलीस उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीमध्ये जर कोणाला न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसण्याची संपूर्ण तरतूद आहे. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून उपोषण करण्यात येत असेल तर सदरील उपोषणाला पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार नाही व त्यांचे उपोषण करण्यासाठी बसू सुद्धा देण्यात येणार नाही, असेही यावेळी फलटण पोलिस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात दिगंबर आगवणे यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे. तरी तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असून त्याबाबत लवकरात लवकर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. सोबतच दिगंबर आगवणे यांच्याविरोधात सुद्धा तक्रारी अर्ज दाखल झालेले आहेत; याबाबत सुद्धा योग्य तो तपास करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिली.