स्थैर्य, नांदेड, दि.८: ‘छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही?’, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला जाब विचारला आहे.
नांदेडमधील सभेला संबोधित करताना संभाजीराजे म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. त्यांनी फक्त मराठ्यांना आरक्षण दिले नाही. त्यावेळच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा सहभाग होता. मग आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही? का मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे,’ असे संभाजीराजे म्हणाले.