मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं – भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । मुंबई । भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती , असं राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यावेळी उपस्थित होते.

श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, किरीट सोमैय्या हे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. सोमैय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याच्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हती असा खुलासा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना सोमैय्या यांना रोखण्यात आल्याच्या घटनेची कल्पना नव्हती असे स्पष्ट केले आहे. एवढ्या महत्वाच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती तर मुख्यमंत्र्यांना नेमकं काय माहिती असतं असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. या घटनांचीही मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई कोकणवासीयांना मिळाली की नाही याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती. असे असेल तर राज्याचे सरकार चालविते तरी कोण असा प्रश्न श्री. उपाध्ये यांनी केला. राज्यातील जनतेच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांना माहिती नसते. मात्र स्वतः वर झालेल्या टीका टिप्पण्णीची त्यांना व्यवस्थित माहिती असते. त्यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना राणावत, अर्णव गोस्वामी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सरकारने तातडीने कशी कारवाई केली हे उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. हीच तत्परता सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबतही दाखवा, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!