दैनिक स्थैर्य | दि. 07 मार्च 2024 | फलटण | जर माढा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाली नाही; तर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यामधील काही दिग्गज नेत्यांना घेऊन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत पुन्हा जाणार असल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर आलेली आहे. सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहेत. यामध्ये महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचा अधिकृत उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नसला तर कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही; असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल व्यक्त केले होते. त्यानंतर फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेला होता. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व शरद पवार यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. एखादा अपवाद वगळता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्यावर सुद्धा थेट शरद पवारांवर टीका कधीही केलेली नाही. त्यामुळे श्रीमंत रामराजे हे पुन्हा शरद पवारांकडे जाऊ शकतात; अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेले दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केलेले होते. या बैठकींमध्ये आढावा घेत असताना जास्तीत जास्त जागांवर भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार लढवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या असून त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत दिल्ली येथे गेले आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात व प्रमुख नेत्यांसोबत महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नेते आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने खलबते करीत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार हे भारतीय जनता पार्टीचे असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाची जागा इतर कोणत्याही मित्र पक्षाला देता येणार नसल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अधिकृत महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतो; असे मत व्यक्त केले जात आहे.