“…तर आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं होईल”, अजित पवारांनी सभागृहात व्यक्त केली भीती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । मुंबई । राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रासाठी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प ९ तारखेला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्यावर गेल्या तीन दिवसांपासून विविध मुद्द्यावर चर्चा होत आहे. त्यासोबतच, राज्यातील इतर विविध मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येत आहे. याच दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका गोष्टीसंदर्भात अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सरकारला सुचित केले. तसेच, असे प्रकार थांबले नाहीत तर राज्याचं वाटोळं होईल असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या विषयावर अजितदादांनी मांडलं मत…

“अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास आपल्या महाराष्ट्राचे वाटोळे होईल”, अशी भीती व्यक्त अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारने गांभीर्याने या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणीही त्यांनी केली.

परीक्षा केंद्र ताब्यात घेऊन भरारी पथकावरच हल्ला

“बुधवार, दिनांक १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टाकळी-मानुरी (ता. पाथर्डी) येथे दहावीचा भूमिताचा पेपर सुरु होता. त्यावेळी परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षा केंद्रात जबरदस्ती प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी याला नकार देताच जमावाने त्यांच्यावर हल्ला केला शिवाय दगडफेक केली. पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद शाळा, सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा धमक्याच केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्यावेळी सामुहिक कॉपी, पेपरफुटीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्याची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होईल. त्यामुळे या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि योग्य ती उपाययोजना केली पाहिजे,” असेही अजित पवार म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!