स्थैर्य, फलटण : भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत असे म्हणून टीका केलेली आहे. याचा फलटण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व त्यांचे सर्व संस्थांचे पदाधिकारी, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध सेलचे पदाधिकारी यांनी गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करून, गोपीचंद पडळकर यांनी खासदार शरद पवार व जनतेची जाहीर माफी मागावी नाही तर त्यांना फलटण तालुक्यात आल्यावर तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन द्वारे देण्यात आला. फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहर व तालुका तालुक्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, शरदचंद्रजी पवार हे गोरगरीब जनतेचे कैवारी व बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. बहुजन समाजातील अनेक नेते निर्माण केले आहेत, समाजकारण जास्ती व राजकारण कमी अशा पद्धतीने गेली पन्नास वर्षे राज्यात व देशात शरद पवार काम करीत आहेत. देशातील सर्व राजकीय पक्षात त्यांचा सन्मान केला जातो. अडचणीच्या काळी सत्तारूढ पक्षही त्यांना सल्ला विचारतात व तो अंमलात आणतात, अशा राजकारणी व धुरंदर नेत्यावर पडळकर यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे.
शरद पवार यांच्यावर टीका केल्याने आपण मोठे होऊ, अशी त्यांची कल्पना असू शकते व ती साफ चुकीचे आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार साहेब यांच्या पाठीशी उभा आहे. पडळकर यांचे जेवढे वय नाही त्याच्यापेक्षा शरद पवार यांचे राजकीय वय आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये व विकासामध्ये शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. देशातील सहकार शिक्षण कृषी इत्यादी विविध क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास झालेला आहे. अनेक सहकारी संस्था व शिक्षण संस्था आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अशा महान नेत्यावर पडळकर यांनी जहरी व मानहानी करणारी टीका केलेली आहे.
तसेच शरद पवार यांच्यावर टीका करून त्यांनी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचे फार मोठे नुकसान केले आहे. याबाबतचे स्पष्टीकरण ही भारतीय जनता पार्टीने खुलासा करावा याबाबत आम्ही फलटण तालुक्यातील सर्व जनता नेतेमंडळी, आमदार सर्व संस्थांचे पदाधिकारी सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध सेलचे पदाधिकारी पडळकर यांचा जाहीर निषेध करीत आहोत. तरी पडळकर यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना फलटण तालुक्यात आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल याची नोंद घ्यावी.