
दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । सातारा । दुचाकीवरील अज्ञाताने एस. टी. बस थांब्यासमोर चार चाकी गाडी उभी असताना त्याची काच फोडून तीन लाख २0 हजाराची रोकड, लॅपटॉपसह बॅग चोरुन नेले. ही घटना शनिवार दि. १९ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान आदर्की बुद्रुक ता. फलटण येथे घडली. याबाबत अमोल बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, अमोल बाळासाहेब जाधव सध्या रा. नवी मुंबई हे आपल्या आदर्की मूळगावी आले होते. त्यांनी स्थानिक संस्थेचे कर्ज भरण्यासाठी फलटण येथून एका खासगी बँकेतुन पैसे घेवून आदर्की येथे आले होते. या दरम्यान, स्टॅण्डवरील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले असता दोन दुचाकीवरील अज्ञाताने रॉडने गाडीची काच फोडून त्यामधील २ लाख तीस हजार रुपये व लॅपटॉप असणारी बॅग घेवून काही क्षणातच पोबारा केला. जाताना डाव्या बाजूच्या टायरची हवा सोडून दिली. ही घटना गावच्या आठवडा बाजार दिवशीच घडल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आदर्की बुद्रुक दूरक्षेत्राचे सपोनि गणेश माने व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात चोरटे सापडण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथकांना सूचना करण्यात आल्या आहेत.