आळजापूरच्या पेट्रोल पंपाच्या टाकीतील ३ लाख २३ हजार ७५८ रुपयांचे पेट्रोल व डिझेलची चोरी


स्थैर्य, फलटण : आळजापुर ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण-सातारा राज्य महामार्गावर असलेल्या भवानीदेवी पेट्रोल पंपावर जमिनीखालील टाकीत ग्राहकांना विक्रीसाठी साठविलेले ३ लाख २३ हजार ७५८ रुपये किंमतीचे पेट्रोल व डिझेल अज्ञातांनी चोरुन नेल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फलटण-सातारा रस्त्यावर आळजापूर, ता. फलटण येथे भवानीदेवी पेट्रोल पंप असून दि. १ जुलै रोजी रात्री पेट्रोल पंपाचे मालक सौरभ दिवाकर निंबाळकर हे  पंप बंद करुन घरी गेले. त्यानंतर पंपावरील कर्मचारी दिपक देशमाने हे केबीनमध्ये झोपले असताना या संधीचा फायदा घेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल व डिझेल साठविलेली जमिनीखालील टाकीचे झाकण काढून पाईपच्या सहाय्याने सुमारे  २ लाख ५२ हजार ८८३ रुपये किमतीचे ३२४५ लिटर डिझेल व ७० हजार ८७५ रुपये किमतीचे ८१० लिटर पेट्रोल असे एकूण ३ लाख २३ हजार ७५८ रुपये किमतीचे पेट्रोल व डिझेल चोरुन नेले. सदरची घटना सकाळी सांडलेल्या डिझेलच्या वासावरुन उघडकीस आली आहे. पेट्रोल पंपाचे मालक सौरभ निंबाळकर यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास  हवालदार दत्ता दिघे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!