
गारपीरवाडी (ता. फलटण) येथे घरात ८९ वर्षीय वृद्धा एकटीच असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण सुमारे १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २ एप्रिल : घरात ८९ वर्षीय वृद्ध महिला एकटीच असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, शेती अवजारे व इतर साहित्य असा एकूण १५ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गारपीरवाडी (पो. चौधरवाडी, ता. फलटण) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजाराम गुलाबराव शिंदे (वय ६३ वर्षे, रा. गारपीरवाडी, पो. चौधरवाडी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी राजाराम शिंदे यांचा मुलगा विक्रांत हा नोकरीनिमित्त मुंबई येथे असतो. त्यामुळे राजाराम व त्यांच्या पत्नी अलका हे मुंबई आणि गारपीरवाडी अशा दोन्ही ठिकाणी ये-जा करत असतात.
दि. २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास ते पत्नीसह मुंबईला मुलाकडे गेले होते. यावेळी त्यांच्या ८९ वर्षीय वृद्ध आई श्रीमती भागीरथी शिंदे या घरी एकट्याच होत्या. आठवड्याभरानंतर दि. ३० मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता राजाराम हे पत्नीसह मुंबईहून गावी परतले. घरी आल्यानंतर त्यांची पत्नी अलका यांनी बेडरूममधील कपाटात पाहिले असता, तिथे ठेवलेले दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घरातील इतर वस्तूंची पाहणी केली असता, काही शेतीची अवजारे आणि इतर साहित्यही चोरीला गेल्याचे आढळून आले.
चोरीला गेलेला मुद्देमाल:
अज्ञात चोरट्याने घरात वृद्धा एकटीच असल्याचा गैरफायदा घेत उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. या चोरीत चोरट्याने खालील १५,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल लबाडीने चोरून नेला आहे:
-
८०० रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र.
-
४,००० रुपये किमतीचा ४० ग्रॅम वजनाचा १ चांदीचा पैंजणाचा जोड.
-
१०,००० रुपये किमतीच्या चांदीच्या १० साखळ्या (साया).
-
२०० रुपये किमतीची ५ विळे व ५ खुरपी.
-
७०० रुपये किमतीचे गणपती डेकोरेशनचे साहित्य.
-
२५० रुपये किमतीची एक पत्राची पेटी.
घरातील दागिने व साहित्य चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर राजाराम शिंदे यांनी दिलेल्या खबरी जबाबावरून दि. ३० मार्च रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
