
स्थैर्य, पुसेगाव, दि. 6 : पुसेगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असणार्या सातारा-पंढरपूर महामार्गावरील नेर खडवी येथील श्रीनिधी पेट्रोलियम नावाच्या पेट्रोलपंपावर अज्ञात चोरट्यांनी डिझेलच्या टाकीत पाईप टाकून उपसा करून अडीच लाख रुपयांचे 3200 लिटर डिझेलची चोरी केली. याप्रकरणी पेट्रोलपंपचे मालक विवेक चव्हाण यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेर (ता. खटाव) हद्दीतील सातारा-पंढरपूर मार्गावर असलेला विवेक चव्हाण यांच्या मालकीचा श्रीनिधी पेट्रोलपंप गेल्या 15 वर्षांपासून रात्रंदिवस सेवा देत आहे. शुक्रवारी (दि. 3) रात्री 3च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या साठवण टाकीत पाईप टाकून 3200 लिटर डिझेल चोरून नेले. पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेर्याची सोय असून देखील चोरट्यांनी इतक्या शिताफीने डाव साधला की रात्रपाळीवर असलेल्या पेट्रोल पंप कर्मचार्यांना देखील या गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही. चोरी झाली त्या रात्री भंडारा व सोलापूर डेपोच्या दोन बस तांत्रिक बिघाड झाल्याने पेट्रोल पंपावर उभ्या होत्या. दुर्दैवाने या दोन्हीही बस डिझेलच्या टाकीनजीक असल्याने सीसीटीव्ही कॅमेर्यात बसच्या पलीकडचे व्हिजन दिसत नव्हते. चोरट्यांनी नेमका याच गोष्टीचा फायदा घेत जवळपास 50 मी. अंतरावर मोटरच्या साह्याने टाकीत पाईप टाकून आपला कार्यभाग साधला. या गुन्ह्याची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.