दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑकटोबर २०२२ । सातारा । मंदिरातील दोन मुकुट आणि रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 ऑक्टोबर रोजीच्या रात्री आठ ते 28 ऑक्टोबर रोजीच्या पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीतील ब्रह्मचैतन्य सद्गुरु रेवडीकर अण्णा महाराज व विठ्ठल रखुमाई मंदिराचे व समाधीच्या दोन्ही दरवाजांची कुलूपे तोडून मंदिरातील विठ्ठल रखुमाई देवांच्या मूर्तीचे चांदीचे मुकुट तसेच दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम असा एकूण 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून सहाय्यक फौजदार बागवान अधिक तपास करीत आहेत.