निमजाई मंदिर, निंबळक येथे चोरी :  देवीचे मखर, मंगळसूत्र, नथ असा ३ लाखाचा ऐवज लंपास


स्थैर्य, फलटण दि. ३ : निंबळक, ता. फलटण येथील पुरातन निमजाई मंदिरातील देवीच्या पाठीमागे व बाजूला बसविण्यात आलेले चांदीचे मखर (महिरप), देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र व देवीची नथ असा सुमारे ३ लाख रुपयांहुन अधिक किंमतीचा ऐवज शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद मंदिराचे पुजारी शिवसागर गुरव (पुजारी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

मंदिराचे मुख्य विश्वस्त राम निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ व भक्त मंडळींच्या सहकार्याने या पुरातन मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार केला असून मंदिराच्या मुख्य इमारतीसह परिसर सुशोभित करण्यात आला आहे. निमजाई देवीच्या मुख्य गाभाऱ्यात देवी मातेच्या मूर्तीचे बाजूने सुमारे २ किलो चांदीची मखर (महिरप) तयार करुन बसविण्यात आली होती, तर देवीच्या गळ्यात अंदाजे १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, सोन्याची नथ होती, चोरट्यांनी चांदीचे मखर (महिरप), गंठण, नथ असा एकूण सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.

मुख्य गाभाऱ्याला असलेले कुलुप काढता न आल्याने कटावणीने कोयंडा तोडून, आत प्रवेश करुन कटावणीनेच चांदीचे मखर (महिरप) काढुन नेताना दोघे इसम मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलीस यंत्रणेने सीसीटीव्ही मधील सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन सदर इसमांना ओळखणारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे दिसत असले तरी या प्रकारात किमान ३/४ जण सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान मंदिरापासून जवळ असलेल्या निंबळक गावच्या हद्दीतील वडाचा मळा शिवारात देवीच्या मखराचे पाठीमागे लावलेले लाकडी आवरण एका झाडाखाली काढून टाकल्याचे आढळून आले असून केवळ चांदी, मंगळ सूत्र व नथ घेऊन चोरटे पसार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अधिक तपास बरड पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.

पहिल्या छाया चित्रात चांदीच्या मखरासह देवीची मूर्ती, दुसऱ्या छायाचित्रात चोरट्यांनी मखर काढून नेल्यानंतर देवीची मूर्ती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!