देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । पुणे । देशातील युवा वर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रामध्ये आपली विजयपताका फडकवेल असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केला.

युवा संकल्प अभियान आणि तसेच या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रांचा संग्रह अपलोड करण्याच्या गिनिज विश्व विक्रमाची घोषणा श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समिती अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यढ्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांनी केवळ इंग्रजांना देशातून घालवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवणे एवढ्याच उद्देशाने नव्हे तर निरोगी भारत, स्वच्छ भारत, शिक्षित भारत, समृद्ध भारत व्हावा या भावनेतून त्याग आणि बलिदान दिले. या उद्देशांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करण्याचे शासकीय स्वरुप बदलून हा कार्यक्रम जनतेचा उत्सव व्हावा असे प्रयत्न आहेत. आगामी २५ वर्षे हा उत्सव देशातील जनता स्वयंस्फूर्तीने साजरा करील. हा उत्सव केवळ सरकारी नसेल तर जनेतचा उत्सव असेल. हा उत्सव साजरा करताना सर्वात पुढे देशातील युवा असेल.

खासदार बापट म्हणाले, संस्कृती आणि मानवता आपल्या देशाची ओळख आहे. आज देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. जगाला नेतृत्व देण्याची ताकद भारतामध्ये असून जेव्हा आपण मोठे होऊ, विद्वान होऊ, ताकदवान होऊ तेव्हा भविष्यकाळात हा देश जगाचे नेतृत्व करेल.

कुलगुरू डॉ. काळे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने तिरंगा ध्वजासोबत छायाचित्रे अपलोड करण्याचा हा विश्वविक्रम युवकांच्या सहभागाने यशस्वी होऊ शकला. मागील २ वर्षात हा दुसरा विश्वविक्रम आहे. विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबत सामाजिक जाणिवेतूनही अनेक उपक्रम राबवत असते.

यावेळी डॉ. राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात युवा संकल्प अभियान तसेच छायाचित्र संग्रहाच्या विश्वविक्रमाबाबतचा आढावा घेतला.

यावेळी गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांनी विद्यापीठाच्या विश्वविक्रमाची घोषणा केली. या उपक्रमाला सहकार्याबद्दल एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत तसेच संजय शर्मा, बागेश्री मंठाळकर, तांत्रिक सहकार्यासाठी एमआयटीचे विद्यार्थी आदींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला हर घर तिरंगा व युवा संकल्प अभियान आयोजन समितीचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि अधिकार मंडळाचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!