दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यामध्ये धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. मात्र, संख्येच्या तुलनेमध्ये समाजातील तरुणांना राजकारणामध्ये स्थान मिळताना दिसत नाही. यासाठी धनगर समाजाला राजकीयदृष्ट्या जागृत करून समाजातील पोरांना राजकीय व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी या धनगर जागर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन माळशिरस तालुक्याचे युवा नेते पांडुरंग वाघमोडे यांनी केले आहे.
धुळदेव, तालुका फलटण येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य धनगर जागर महामेळाव्यात वाघमोडे बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री अण्णासाहेब डांगे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार अॅड. रामहरी रूपनवर, श्री श्री रविशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बजरंग गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बजरंग खटके, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, श्री धूळदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय भिवरकर, सचिव मारुतराव भिवरकर, ग्रामपंचायतीचे सरपंच व्यंकटराव दडस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पांडुरंग वाघमोडे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष हे धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधीत्व देताना दिसत नाही. समाजातील पोरांना राजकारणामध्ये पदे व महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही, असे सांगून पांडुरंग वाघमोडे म्हणतात की, धनगर समाजाचा फक्त राजकीय निवडणुकीपुरता व मतांसाठी वापर केला जात आहे; परंतु सर्व पक्षांनी हेही लक्षात ठेवावे की, ही जात प्रामाणिक आहे. भविष्यात या जातीला राजकारणामध्ये योग्य ते प्रतिनीधीत्व मिळाले नाही तर हा समाज गप्प बसणार नाही. तो निश्चितच आपली राजकीय प्रवासाकडे जाणारी वाटचाल शोधेल, असेही पांडुरंगतात्या वाघमोडे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, अॅड. रामहरी रुपनवर, भाजप प्रवक्ते गणेश हाके, बजरंग खटके, माणिकराव सोनवलकर यांची समायोजित भाषणे झाली.
कार्यक्रमात धनगर समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांचा ‘श्रीमंती धनगराची’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भिवरकर यांनी केले. दादासाहेब चोरमले यांनी आभार मानले.