फलटणला स्वतःची ओळख निर्माण करून देणारे सन २०२४; वर्षातील महत्वाच्या घटनांचा मागोवा; वाचा सविस्तर…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०२ जानेवारी २०२५ | फलटण | प्रसन्न रूद्रभटे | सन २०२४ हे फलटण तालुक्यासाठी अनेक महत्वाच्या घटनांचे वर्ष राहिले आहे, ज्यामुळे तालुक्याचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरणात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.

विधानसभेला राजे गटाचा पराभव…

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांनी सर्वांचे लक्ष वेधले. या निवडणुकीत हॅट्रीक आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण यांचा पराभव करत सचिन पाटील यांनी तब्बल 18 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी घोषित झालेल्या निकालाने फलटणमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती ती नाकारत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली व पराभूत झाले.

लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव…

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. दि. 4 जून 2024 रोजी पार पडलेल्या मतमोजणीत धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते.

“डॉ. तात्याराव लहाने” श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने सन्मानित…

फलटण तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. दि. 14 मे 2024 रोजी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवात ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार 2023-2024’ देण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आला.

फलटणला मिळाले २ समाजभूषण पुरस्कार…

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (संस्था) 2023’ मुंबईत जमशेदजी भाभा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. श्री. सचिन सूभाषराव सूर्यवंशी (बेडके) आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके) यांना दि. 12 मार्च 2024 रोजी प्रदान करण्यात आला होता. यासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले यांना सुद्धा समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. दादासाहेब चोरमले यांनी माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांच्यासमवेत पुरस्कार स्वीकारला होता.

नगरपरिषदेला मिळाले “वर्ग १”चे मुख्याधिकारी…

फलटण तालुक्यात प्रशासकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण प्रगती झाली. मार्च 2024 मध्ये फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा निखील मोरे यांनी कार्यभार स्विकारला. निखील मोरे हे मुळ इंदापूर तालुक्यातील असून त्यांचे शिक्षण सांगली येथे संपन्न झाले आहे. सन 2019 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजु झाले आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर व सोलापूर महानगरपालिकेत आपली सेवा बजावली आहे.

“MH 53” फलटणची नूतन ओळख…

सप्टेंबर 2024 पासून फलटण व माण तालुक्यातील नवीन वाहनांसाठी एम. एच. 53 ही वाहन मालिका कार्यान्वित झाली. या माध्यमातून एम. एच. 53 ही नवीन ओळख फलटणला प्राप्त झाली आहे. फलटण येथे परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचा शुभारंभ 15 मार्च 2024 रोजी करण्यात आला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

फलटण – बारामती रेल्वे मार्गाचे भूमिपूजन…..

लोकनेते माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन दि. १२ मार्च २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांनी ऑनलाईन संपन्न केले. यावेळी फलटण रेल्वे स्थानकावर मोठा समारंभ सुद्धा संपन्न झाला होता. याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वडिलांचे स्वप्न पूर्ती करत असल्याने भाषण करताना अश्रू अनावर झाले होते. यासोबतच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या पत्रकारांच्या समवेत मागणी म्हणजेच फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत सुद्धा समावेश करण्यात आला आहे; याबाबत तत्कालीन रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे समक्ष मागणी करताच मंजुरी दिली होती.

बहुचर्चित “नीरा – देवधर व नाईकबोंबवाडी एमआयडीसी”चे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

नीरा – देवधर प्रकल्पाच्या कालव्याच्या भूमिपूजन समारंभासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील काळज येथे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला होता. त्यानंतर फलटण येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य जाहीर सभा संपन्न झाली होती. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील श्रीराम मंदिरात जात प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले होते.

फलटण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा शुभारंभ…

फलटण येथे दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रकाश नाईक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक रा. जोशी, फलटणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. प्रविण विमलनाथ चतुर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत बंटीराजे खर्डेकर – निंबाळकर यांचे निधन…

जेष्ठ नेते तथा शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर – निंबाळकर यांचे दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे येथे उपचाराच्या दरम्यान निधन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १३ ऑक्टोबर रोजी फरांदवाडी येथे श्री साईराज उद्योग समूह येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह फलटण तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांचे निधन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शरदचंद्र पवार यांचे खंदे समर्थक सुभाषराव शिंदे दि. 13 मार्च 2024 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर खा.शरदचंद्र पवार, खा. सुप्रिया सुळे, ना.अजितदादा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी शिंदे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेऊन सुभाषराव शिंदे यांना आदरांजली अर्पण केली.

फलटण श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धाराचे भूमिपूजन…

शेकडो वर्षांची मागणी असलेले अयोध्या येथे दि. २२ जानेवारी २०२४ रोजी उभारणी झाली. व प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण तालुक्यात ठीक ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला. फलटण येथे श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवास विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम मंदिर शिखर जीर्णोद्धार प्रक्रिया सुरू करण्यात आली.

बैलगाडा मालक रणजित निंबाळकर (सर) यांचा निर्घृण खून…

बैलगाडा क्षेत्रामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले रणजित निंबाळकर (सर) यांचा निंबुत येथील गौतम काकडे यांनी निर्घृण खून केली असल्याची घटना सुद्धा याच वर्षात घडली आहे. या घटनेचे पडसाद हे सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळाले होते.


Back to top button
Don`t copy text!