स्थैर्य, खटाव, दि.१९: महाराष्ट्र, कर्नाटक,राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील भूषणगड येथील श्री क्षेत्र “हरणाई”देवीचा यात्रा महोत्सव सालाबादप्रमाणे घटस्थापणे पासून दुर्गाष्टमी पर्यंत चालतो व खंडेनवमी ला गडावर मोठी यात्रा भरते, यामध्ये गडावर हरिभक्त पारायण,भजन, कीर्तनाचा कार्यक्रम अखंड पणे सुरू असतो,काही भक्त मंडळी तर सात दिवस गडावरच मुक्कामी असतात. पंचक्रोशीतील अनेक भक्त मोठ्या संख्येने गडावर ये जा करत असतात.
श्री हरणाई देवी ट्रस्ट मार्फत गडावर अनेक सुविधा करून देण्यात आल्या आहेत. गडावर शुद्ध पिण्याचे पाणी,निवारा आदी गोष्टी आहेत. तसेच ऐतिहासिक पाऊल खुणा पाहण्यासाठी विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
मात्र कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी शासनाच्या सूचनेनुसार हा उत्सव संपन्न होत आहे.औंध पोलीस ठाण्याच्या अंकित हे क्षेत्र असल्याने या पोलीस स्टेशन चे नेहमीच उत्तम सहकार्य मिळत असून या वर्षी सहायक पोलीस निरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
या मध्ये देवीचे मंदिर पूर्ण पणे बंद ठेवण्यात आले असून,फक्त पूजा व आरती साठी मोजक्या लोकांसह नियमांचे पालन करून काही वेळा साठी हे मंदिर उघडण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता हा भूषणगड किल्ला समुद्र सपाटी पासून साधारण एक हजार पाचशे फूट उंचीवर असून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पण निसर्गाच्या सानिध्यात हा गड अतिशय खुलून दिसत असल्याने पर्यटक या गडाला पहिली पसंती देत आहेत. अनेक सामाजिक संघटना या गडावर वारंवार स्वच्छता मोहीम राबवित असतात
मात्र या वर्षी यात्रा महोत्सव साधेपणाने होत असून शनिवार दि २४ ऑक्टोबर हा श्री हरणाई देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे.भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व कोणत्या ही संकटात भक्तांना हार न पत्करू देणारी देवी म्हणजे”हरणाई” अशी ख्याती या देवीची आहे.भक्तांना त्वरित पावणारी जागृत देवी असल्याने भक्त ही मोठ्या उत्साहात देणग्या देत असतात.याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या वर्षी सौ.मालन जगन्नाथ चव्हाण, मरडवाक यांनी श्री हरणाई देवी चरणी मानाची पालखी अर्पण केली आहे.
अशा या गडावरील जागृत हरणाई देवीला एकदा दर्शनाला गेल्यावर भक्तांना अनुभव आल्या शिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की.
-डॉ विनोद खाडे, विशेष प्रतिनिधी