
दैनिक स्थैर्य । 28 जून 2025 । फलटण । शरयु साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संचालक अविनाश भापकर, युनिट हेड विजय जगदाळे, वर्क्स मॅनेजर विनायक जाधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
शरयू शुगर मिलचे कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आगामी ऊस गाळप हंगामामध्ये दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील हंगामातील ऊस बिले सर्वोत्तम दर देऊन एक रकमी वेळेत अदा केली आहे. परिसरातील शेतकर्यांनी शरयुकडे उत्स्फूर्त ऊस नोंदी केल्या आहेत. त्यामुळे आगामी गळीत हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया कारखाना कार्यस्थळावर सुरू आहे. परिसरातील स्थानिक ऊस वाहतूकदारांना प्राधान्य देण्यात येत आहे. वाहन मालकांनी शेती खात्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच कारखाना गाळप हंगाम घेण्यास तयार होणार आहे.
एआयचा वापर काळाची गरज असून परिसरातील शेतकर्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी हे तंत्रज्ञान अवगत करून प्रगतशील ऊस शेती करण्याचे आवाहन युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे. मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.