● सातारा आगारच्या जगताप, निंबाळकर या चालकांची कामगिरी ● अन्फाम वादळामध्ये 8 तास अडकले
स्थैर्य, सातारा, दि. 22 : सातारा शहरातील पश्चिम बंगाल राज्यातील असलेल्या मजुरांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्याची जबाबदारी सातारा आगाराने घेतली होती. सातारा आगाराने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चालक एस. टी. जगताप आणि एस. एस. निंबाळकर यांच्यावर जबाबदारी सोपवली. सलग दोन दिवस आणि दोन रात्रीचा प्रवास करत त्या 22 मजुरांना पश्चिम बंगालमधील नुधीया या जिल्ह्यात सुखरूप पोहचवले. हा जिल्हा बांग्लादेशला जोडून आहे. साताऱ्याकडे परत फिरताना ते दोन्ही चालक वादळात आठ तास खडकपूर येथे अडकले. येवढ्या लांबच्या प्रवासाची आठवण घेऊन ते दोन्ही चालक मजल दरमजल करत दि. 20 रोजी सातारच्या मायभूमीत पोहचले.
सातारा शहरात लॉक डाऊनमुळे बाहेरच्या राज्यातील मजूर अडकले होते. त्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 22 जणांनी पश्चिम बंगालमध्ये असलेल्या नुधीया या जिल्ह्यात सोडण्याची विनंती केली होती. सातारा आगारचे अधिकारी संजय भोसले, रेश्मा गाडेकर यांनी एम. एच. 13 ई ओ 8471 ही बस पाठवण्यासाठी चालक एस.टी. जगताप आणि एस. एस. निंबाळकर या दोघांच्यावर सोपवली. दि.15 रोजी सगळी भराभरी करून त्या 22 जणांची तपासणी करून सायंकाळी 7.30 वाजता बस सातारा आगारातून रवाना झाली.
राज्यातले रस्ते माहिती असतात परंतु बाहेरच्या राज्यात रस्त्यांची माहिती नसली तर सोबत घेतलेल्या शिदोरीसह यांचा प्रवास सुरु झाला. बाहेर पडताना गाडीत डिझेल टाकी फुल केली होती. दोनशे किलोमीटर अंतर एकाने तर दुसरे दोनशे किलोमीटर अंतर दुसऱ्याने गाडी चालवत हा प्रवास सुरू केला. एका दिवसात 900 किलोमीटर अंतर कापले जात होते. पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी आणि थोडावेळ चेक पोस्टवर तपासण्या करण्यासाठी थांबले जात होते. तेथेच जेवण खाणे केले जात होते. तब्बल चार राज्यांच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल येथील नुधीया या जिल्ह्यात दि 17 रोजी रात्री 12.30 ला गाडी पोहचली. त्या 22 जणांचे मेडिकल तपासणी केल्यानंतर दि.18 रोजी सकाळी 12 वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत त्यांना ओडिशा राज्यात अन्फन या वादळात सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबावे लागले.