“कार्यकर्ते घरी बसले म्हणूनच पराभव”; श्रीमंत रामराजेंनी कार्यकर्त्यांना फटकारले, आगामी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले; विरोधकांनाही सज्जड दम


स्थैर्य, फलटण, दि. 19 ऑक्टोबर : आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज कोळकी येथे आयोजित मेळाव्यात जोरदार भाषण केले. मागील निवडणुकीतील पराभवाचे खापर कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेवर फोडतानाच, त्यांनी विरोधकांच्या राजकारणाच्या पद्धतीवरही सडकून टीका करत पुढील वाटचालीचा स्पष्ट इशारा दिला.

कोळकीतील अनंत मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्याचा मुख्य उद्देश पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेणे हा असला तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजेंनी कार्यकर्त्यांना खडबडून जागे केले. ते म्हणाले, “बरेच दिवसांनी आपली गाठभेट होत आहे. निवडणुका झाल्या, आपण हरलो. जे जायचे होते ते गेले, उरलेले शिल्लक राहिले.”

पराभवाचे आत्मचिंतन आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या

गेल्या निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण मांडताना रामराजे यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “एवढी लोकं गोळा करतात मग सीट का पडते?” असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “उत्तर हे आहे की कार्यकर्ते आहेत, जनतेत राग नाही, मग झाले कसे?” निवडणुकीच्या दोन दिवस आधी प्रतिस्पर्ध्यांकडून पैसे वाटले जात असताना कार्यकर्ते गप्प का बसले, असा सवाल त्यांनी विचारला. “तुमच्या गावात रात्रीच्या पैशाच्या गाड्या फिरत होत्या, मग तुम्ही काय करत होता बायकांबरोबर टीव्ही बघत? पाय रोवून जर तुम्ही बाहेर पडला असता तर पैसे वाटप थांबलंच असतं,” अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना फटकारले. तुम्ही जर घाबरून घरी बसणार असाल तर आम्हाला लढाई करायची आहे, पण सैन्यच पळपुटे निघाले तर काय उपयोग, असे ते म्हणाले.

राजकारणाच्या बदललेल्या पद्धतीवर टीका

तालुक्यातील सध्याच्या राजकारणाच्या पद्धतीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. “२०१९ पासून जे राजकारण सुरू झाले, कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुमची बिलं अडवतो, टेंडर मागू नको बघून घेतो, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर दीड-दीड कोटीचे दंड लावायचे, पोलिसांमार्फत दमदाटी करायची, खोट्या केसेस लावायचे, हे सगळे आपण भोगलेले आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी स्वतःच्या आणि चिमणराव कदम यांच्या काळातील राजकारणाची तुलना करत, आम्ही सत्तेचा गैरवापर करून कधीही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, कारण ते आमचे संस्कार नाहीत, असे स्पष्ट केले.

अस्तित्वाचा प्रश्न आणि कार्यकर्त्यांकडून अपेक्षा

ही निवडणूक आता आमची राहिलेली नसून कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाची आणि शांततेने जगण्याची लढाई बनली आहे, असे रामराजे म्हणाले. “आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय, उद्या नागरिक म्हणून हा त्रास भोगावा लागणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला. मला आता वाद घालणारा, गाव पातळीवर पोलीस चौकीला न घाबरणारा कार्यकर्ता अपेक्षित आहे. वाटेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही जाऊ तुमच्यासाठी तुरुंगात, पण तुम्ही मागे हटता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.

पक्ष आणि भविष्यातील भूमिका

“पुढे काय करायचं म्हणजे काय? कुठल्या पक्षात जायचं एवढंच डोक्यात आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनस्थितीवर बोट ठेवले. “आपला मूळ पक्ष हा अपक्षच आहे. पक्ष गौण आहे आपल्या तालुक्यात,” असे सांगत त्यांनी पक्षीय बांधिलकीपेक्षा गटाला महत्त्व असल्याचे सूचित केले. मात्र, आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असेही म्हणत नसल्याचे सांगत त्यांनी भविष्यातील निर्णयाची दिशा गुलदस्त्यातच ठेवली. कोणत्या पक्षात जायचे हे मी ठरवेन, मला कळते, ३० वर्षे मी काय मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत बसलो नव्हतो, असे ते म्हणाले.

सोडून गेलेल्यांवर टीका जे सोडून गेले त्यांच्याबद्दल मला फारसे बोलायचे नाही, ‘गेले ते मेले’, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. “संध्याकाळी यादी काढा, एक सणसणीत अंघोळ करा आणि ओम शांती म्हणा,” अशा शब्दात त्यांनी सोडून गेलेल्यांची बोळवण केली.

तरुण पिढी आणि विकास निरा देवघर धरणाच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले, “धरणच झाले नसते तर पाईपलाईन टाकली असती का?” तरुण पिढीने दुष्काळ पाहिला नाही, ती आता कालव्यात बुड्या मारत आहे, त्यांना काय आठवण असणार, असेही ते म्हणाले. श्रीराम कारखाना वाचवला नसता तर काय झाले असते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेवटी, कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करत, आगामी काळात पाय रोवून गावात उभे राहण्याचा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतला. मोठ्या संख्येने हात वर करून कार्यकर्त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला.


Back to top button
Don`t copy text!