
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । सुमारे 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन कामगार पसार झाल्याची तक्रार वाठार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनगर, सातारा येथील सुखदेव दादा माने वय 43 यांनी आपल्या हॉटेल व्यवसायासाठी देऊर, तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत पांडवाचा माळ नावाच्या शिवारात कोंबड्या पाळल्या होत्या. या कोंबड्यांच्या देखभालीसाठी त्यांनी प्रकाश जनार्दन बाड राहणार चिकमोहुद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर याला तेथेच एक शेड बांधून कामावर ठेवले होते. दिनांक 2 ऑगस्ट च्या सकाळी साडेदहा ते चार ऑगस्ट च्या सकाळी दहा पर्यंत प्रकाश बाड याने सुखदेव माने यांच्या कावेरी जातीच्या 300 कोंबड्या, फवारणी यंत्र, पी व्ही सी व प्लॅस्टिक पाईप, स्टीलचे कपाट, 15 खुर्च्या, तारांचे पाच बंडल, ड्रिप पाईपचे पाच बंडल आणि संसारोपयोगी साहित्य असा एकूण 44 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे. या चोरीची फिर्याद सुखदेव माने यांनी वाठार पोलीस ठाण्यात नोंदवली असून अधिक तपास पोलीस हवालदार के. एच. गिरी करीत आहेत.