दैनिक स्थैर्य | दि. २० डिसेंबर २०२४ | फलटण |
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फलटणचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी फलटण व कोरेगाव या मतदारसंघातील शेतकर्यांच्या द़ृष्टीने महत्त्वाची असलेली पाणंद रस्त्याची कामे आवश्यक निधी मंजूर करून तातडीने पूर्ण करण्याची मागणी विधानसभेत केली.
विधीमंडळात बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून हे सरकार नेहमीच सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आले आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करून हे सरकार महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच राज्यातील शेतकर्यांसाठी अनेक हिताचे निर्णय हे सरकार घेत आहे. अनेक योजनांच्या लाभाच्या माध्यमातून त्याचे चांगले परिणाम शेतकर्यांच्या हिताच्या द़ृष्टीने झाल्याचे दिसून आले आहे. याबद्दल महायुती सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो.
राज्यात पाणंद रस्ता बनविण्यासाठी असलेली योजना शेतकर्यांसाठी अतिशय फायदेशीर झाली आहे. माझ्या फलटण-कोरेगाव मतदारसंघातील अनेक गावात पाणंद रस्त्याची या योजनेतून कामे सुरू आहेत. मात्र, बरेच रस्ते खराब झाले असल्याने या पाणंद रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. या भागातील शेतकरी बागायती पिके, भाजीपाला तसेच उसाचे चांगले उत्पादन घेत आहे. परंतु रस्ते जर खराब असतील तर त्याने पिकविलेला माल बाहेर काढताना त्याला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे बर्याच शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी माझ्या मतदारसंघातील पाणंद रस्त्याची कामे तातडीने सुरू करावीत तसेच जी कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करावीत. यासाठी लागणारा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी मी करत आहे.