‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ फेब्रुवारी २०२३ । पुणे । जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून  देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गुरूदेव श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असताना सामाजिक दायीत्वही गुरूदेवांनी आपल्याला शिकवले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि महाराष्ट्रातील 17 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग अग्रेसर होती.

गुरूदेव भारतीय संस्कृतीचे संदेशवाहक

गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशात भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्म लोकांमध्ये जागृत केले आणि त्यांच्या रुपाने भारतीय संस्कृतीचे संदेश वाहक पहायला मिळाले. जागतिक शांती परिषदेच्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना  एकत्र करण्याचे कार्य गुरूदेवांनी केले.

विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे.  या विचारांमुळेच जगाच्या पाठिवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यात झाल्याचे नमूद करून पुणे हे बुद्धी अणि विद्येचे माहेरघर असल्याने इथेच अथर्वशिर्षाचे पठण होणे स्वाभाविक आहे आणि अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले, पुणे शहरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीचा सोहळा साजरा होतो. तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या डॉ.चित्रा आणि वर्ल्ड बुक ऑफ लंडनचे डॉ.दीपक हरके यांच्या हस्ते गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!