विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ सप्टेंबर २०२२ । अकोला । राज्यातील कृषीविद्यापीठांचे कार्य हे शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे असून  विद्यापीठांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे,असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. तसेच सर्व अधिकारी, संशोधक व प्राध्यापकांनीही एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही ना. सत्तार यांनी केले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुक कृषी विद्यापीठ येथे आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठक घेतली.  या बैठकीस कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. विप्लव बाजोरिया, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदय विठ्ठल सरप, श्रीमती अर्चना बारब्दे, विद्यापीठातील अधिकारी वर्ग, विभागप्रमुख, संशोधक व अमरावती विभागाचे कृषी सह संचालक डॉ. किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. आरीफ शाह, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या समोर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची सविस्तर माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले. कृषीमंत्री म्हणाले की, विद्यापीठाने विविध पिकांचे संशोधन करतांना मागणी प्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करावे. संशोधन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर असणे आवश्यक आहे.  चांगल्या वाणांना चालना द्यावी. सेंद्रीय शेतीच्या अनुषंगाने  अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय उत्पादनांकडे वळावे यासाठी चालना द्यावी. संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.  लोकांना अधिक शक्तिदायक अन्न उपलब्ध करुन देणाऱ्या पिकांच्या जाती संशोधित कराव्या.  आदिवासी क्षेत्रातील दुर्लभ पिकांच्या जातींचा विकास करावा.  आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आदिवासी क्षेत्रातच व्यवस्था करावी., शेतीच्या सिंचनासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे. विद्यापीठाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी पदभरतीला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी आवश्यकतेच्या प्राधान्यक्रमानुसार पदभरती करण्याबाबत शासन पावले उचलेल असेही ना. सत्तार यांनी सांगितले.

कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या कुलगुरुपदाच्या कारकीर्दीचा अखेरचा दिवस असल्याने त्यांचा सत्कारही कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. किशोर बिडवे यांनी सुत्रसंचालन केले. तत्पूर्वी कृषीमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वाण व उत्पादनांच्या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.


Back to top button
Don`t copy text!