विषयाचे कार्य महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । मुंबई । महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रेरणादायी असलेल्या प्रत्येक महिलेचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देणे काळाची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रवी भवन येथे सत्कारप्रसंगी सांगितले. प्रथम महिला रुग्णवाहिका चालिका डागा स्त्री रुग्णालयात कार्यरत असल्याचा आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोना सारख्या संकटात खंबीरपणे पुरोगामी विचारांना सन्मान देणारे आणि  कोरोना सारख्या संकटात खंबीरपणे उभे राहुन महाराष्ट्राची आरोग्य सेवा सांभाळणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज आरोग‌्य सेवेतील प्रथम महिला रुग्णवाहिका चालिका विषया गोपीनाथ लोणारे यांचा शाल, श्रीफळ देवुन सत्कार केला.

महाराष्ट्रातील संस्कृती ही पुरोगामी विचार देणारी आहे. महिलांचा सन्मानाची शिकवण देणारी मॉ जिजाऊ, स्त्रियांकरीता शिक्षणाची दारे उघडणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी विराजमान होणारी प्रथम महिला श्रीमती प्रतिभाताई पाटील आदी अनेक महिला या राज्याने देशाला देवुन पुरोगामी विचारांचा आणि महिला सक्षमीकरणाचा झेंडा रोवला आहे. याच विचारांचा वारसा आरोग्य सेवेतील प्रथम महिला रुग्णवाहिका चालिका विषया गोपीनाथ लोणार (नागदेवे) यांनी चालविला. तिचे व्यक्तिमत्व सामाजातील युवतींना प्रेरणा देणारे ठरत आहे, असे ते म्हणाले.

वाहन चालक हा पेशा स्विकारल्यावर गर्भवती महिला, माता यांच्या सेवेत सदा सर्वदा 24 तास सेवा देणाऱ्या महिला रुग्णालयात रुग्णसेवा देतांना अत्यंत आनंद होत असून समाधान लाभत असल्याचे विषया लोणारे यांनी यावेळी सांगितले. विषयाला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायसवाल आणि डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ. सिमा पारवेकर यांनी खूप प्रोत्साहित केले. भविष्यात आरोग्य सेवेत मनोभावे सेवा देत सामाजातील मुलींना संघर्षाला न घाबरता पुढे येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा निर्धार तिने व्यक्त केला.

या सत्कारप्रसंगी नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!