स्थैर्य, कराड, दि. 6 : रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हा अनेक दिवसांपासून सुरू आहे. सर्वच क्षेत्रात रोटरीचे काम प्रशंसनीय आहे. सर्वत्र वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून रोटरी क्लबतर्फे पावसाळ्याच्या सुरवातीला वृक्षारोपण केले जात आहे. या क्लबचे हे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
म्होप्रे, ता. कराड येथे मलकापूर रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सनबिम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सारंग पाटील, मलकापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष सलीम मुजावर, सेक्रेटरी प्रवीण जाधव, भगवान मुळीक, धनाजी देसाई, विजयराव चव्हाण, विजय लिगाडे, अमर जाधव, संदीप पाटील, चंद्रशेखर दोडमणी, दिलीप संकपाळ, सरपंच तुकाराम डुबल, माजी सरपंच राहुल संकपाळ, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाधव, पोलीस पाटील सुनीता माने आदींची उपस्थिती होती.
सलीम मुजावर म्हणाले, रोटरी क्लबच्यावतीने विविध कार्य केले जात आहे. कोरोना काळातही क्लबने मास्क, सॅनिटायझर आदी वाटप केले आहे. नुकताच कोरोनात रुग्ण सेवा करत योद्धा बनून लढा देत असलेल्या डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणूनही रोटरीतर्फे प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले जात आहे. यावेळी रोटरी क्लबच्यावतीने खा. श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान म्होप्रे येथील माळरानावर रोटरी क्लब व ग्रामपंचायतीच्यावतीने 50 विविध जातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.