पुण्यातील फॉरेन्सिक लॅबला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट
स्थैर्य, मुंबई दि.२७ : पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. गुन्हे सिद्ध करण्याकरिता या लॅबचे मोठे योगदान असून लॅबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी काढले.
गृहमंत्री देशमुख यांनी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली, त्यांच्या कामाची पद्धत, अडीअडचणी जाणून घेतल्या.
प्रारंभी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुण्याचे उपसंचालक राजेंद्र कोकरे यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत करून या प्रयोगशाळेत होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण, जीवशास्त्र, डीएनए, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण व उपकरणे, आणि दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सहायक संचालक श्रीमती धर्मशिला सिन्हा, नीलिमा बक्षी, सोनाली फुलमाळी, वैशाली शिंदे, अंजली बडदे, महेंद्र जावळे आदी उपस्थित होते.