
दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। फलटण । प्रगत शिक्षण संस्थेने केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील 205 व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात 50 अंगणवाड्यांसोबत बालशिक्षणात उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे माण तालुक्यातील अंगणवाडीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे प्रगत शिक्षण संस्थेचे माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबतचे काम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन टाटा एज्यूकेशन विभाग महाराष्ट्राच्या प्रमुख मालविका झा यांनी केले आहे.
त्या राजवडी ता. माण येथील उमाजीनगर अंगणवाडीच्या भेटी दरम्यान बोलत होत्या.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक अशोक के, माल्लामा बी, तारासिंग जे, वरिष्ठ समन्वयक गिरीश आर, तालुका समन्वयक शांताम्मा, मुद्देश, बालक शिक्षण कार्यक्रम अधिकारी कोटरेश वाय, बालविकास विभागप्रमुख चिटकालांबा एन, कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, प्रकल्प सहाय्यक नम्रता भोसले तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.
प्रमुख मालविका झा, टाटा ट्रस्ट्सची एक सहयोगी संस्था कलिकेच्या प्रतिनिधीनी माण तालुक्यातील या दोन अंगणवाड्यांना भेटी दिल्या. कलिके समृद्धी उपक्रम राबविण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. कलिके कर्नाटकातील यादगीर या जिल्ह्यात कार्यरत आहे. जो सर्व विकास निर्देशांकांनुसार राज्यातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक आहे.
या भेटीत उमाजीनगर अंगणवाडीच्या सेविका नीलम जगदाळे व पल्लवी सुभाष यादव व मदतनीस जयश्री आकाराम भोसले यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. या चर्चेदरम्यान मालविका झा यांनी अनेक गोष्टीबाबत माहिती घेतली. हे मुक्त खेळाचे कोपरे तुम्ही रोज मांडता का? कोपर्यावरील खेळ किती दिवसांनी बदलता? 5 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना तुम्ही अक्षरे शिकवता त्यावेळी इतर वयोगटातील मुले काय करतात?
यावर सेविका ताई म्हणाल्या, प्रत्येक वयोगटातील मुलासोबत आम्ही नियोजन स्वतंत्र करतो. 3 ते 4 वयोगटातील मुले मुक्त खेळाच्या कोपर्यावर खेळतात. गोष्टीच्या पुस्तकाचा वापर कसा करता? पुस्तके कधी बदलता? मुलांना वेगवेगळी गाणी घेता की भिंतीवर लावलेलीच घेता. सेविका ताई म्हणाल्या, आम्ही दर महिन्याला नवीन गाणे घेतो. अक्षर दृढीकरण खेळ, वर्क शीट याविषयी चर्चा केली.
संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले यांनी अंगणवाडीत घेण्यात येणारे उपक्रम, सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षणे, अॅक्टिव्हिटी किट, इतर साहित्य, प्रकल्प सहाय्यक व प्रकल्प अधिकारी भेटी, प्रगत शिक्षण संस्थेचा बालशिक्षण कार्यक्रम व त्यांचा प्रत्यक्ष वापर याविषयी माहिती दिली.