दैनिक स्थैर्य । दि.२९ जानेवारी २०२२ । कोल्हापूर । शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पर्यटन, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज कोल्हापूर येथे श्री अंबाबाईचे दर्शन घेतले, त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्या बोलत होत्या.
राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील आहोत. समाज माध्यमांचा वापर वाढला असला तरीही वृत्तपत्रांचे स्थान कायम आहे. वृत्तपत्र वाचून मगच दिवसाची सुरुवात करणारा मोठा वर्ग आहे. वृत्तपत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. पत्रकार सन्मान योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. 30 वर्ष पत्रकारिता केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे
पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अन्नछत्र, भक्त निवास व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, या मंदिराची वास्तू शिल्प कला अप्रतिम आहे. श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा व यानुषंगाने अन्य बाबींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.