
दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती तसेच ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या वास्तव्या दरम्यान फलटण नगर परिषद अधिकारी, कर्मचार्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. चुकीचे काम केल्यास बोलले पाहिजे, प्रसंगी कान धरावा लागेल, पण योग्य काम केल्यानंतर त्याचे कौतुक करुन प्रोत्साहनही दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण नगरपरिषद सभागृहात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचार्यांचा फेटा बांधून यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीमधील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर, आजी – माजी नगरसेवक, नगरसेविका आणि नगर परिषद अधिकारी कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.
अतिवृष्टीत बाणगंगा नदी काठ व शहरातील अन्य भागात पावसाचे पाणी अनेक कुटुंबांच्या घरात शिरले. घरातील अन्नधान्य, चीज वस्तू, कपडे, फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी घरात शिरल्याने कुटुंबाची मोठी तारांबळ उडाली. अशावेळी नगर परिषद अधिकारी, कर्मचार्यांनी या नागरिकांना दिलासा देत त्यांना सुखरुप बाहेर तर काढले. तसेच घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले. पूर ओसरल्यानंतर घरातील गाळ काढला. या कर्मचार्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत कौतुकास्पद असल्यानेच त्यांचा यथोचित सन्मान करुन पाठीवर शाबासकीची थाप देण्याचा निर्णय घेतला.
नगरसेवक, अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मतभेद असू शकतात. परंतु संकटाच्यावेळी मतभेद विसरुन एकजुटीने पुढे यावे लागते. नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यांनी एकजुटीने पूर परिस्थितीत युद्ध पातळीवर काम करुन नागरिकांना दिलासा दिला.
आ. सचिन पाटील सुध्दा पूर सदृश्य परिस्थितीत लोकांना भेटून दिलासा देत होते. अतिवृष्टीत सुमारे 140 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात नुकसान भरपाई दिली आहे. तथापि रस्ते, पूल, शासकीय इमारती यांचेही झालेले नुकसान मोठे आहे. त्याबाबतही आपण शासनस्तरावर नुकसान ग्रस्त सार्वजनिक मालमत्तेची तातडीने पुनर्रस्थापना करण्यासाठी प्रयत्नशील त्यांनी स्पष्ट केले.
दुर्दैवाने गेल्या 30 वर्षात ते येथे घडले नाही. आता आपल्याला ठोस भूमिका घेऊन स्वच्छता व सर्वांगीण विकासाला प्राधान्य देवून काम करावे लागणार आहे. सुदैवाने आमदार चांगला मिळाल्याने त्यामध्ये आपण कोठेही कमी पडणार नसल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी दरम्यान या कर्मचार्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता अहोरात्र गाळ, चिखल, पाऊस, प्रसंगी गटारात उतरुन काम केले असल्याने सर्व कर्मचार्यांनी आरोग्य तपासणी करुन तातडीने उपचार करुन घेण्याची सूचना मुख्याधिकारी निखिल मोरे यांना केल्या. फलटण शहरात पाणी पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आहेत, त्याबाबत सर्वेक्षण करुन अहवाल तयार करा, शहरात योग्य दाबाने, पुरेसा, स्वच्छ, निर्जंतुक पाणी पुरवठा नियमित झालाच पाहिजे.